बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

दुर्दैवी

''कळमसरात राहायला घर? अहो, येथे नवीन घरे कोणी बांधत नाही. जुनी मात्र पाडण्यात येतात. गेल्या दोनचार महिन्यांत चारपांच तरी घरे पाडण्यात आली. पूर्वी हा भरण्याचा गाव. गजबजलेला असे. परंतु आता वैभव राहिले नाही. जिकडे तिकडे पडकी मोडकी घरे दिसतील. दगडाधोंडयांच्या राशी ठायी ठायी दिसतील. वाईट दिवस येत चालले, दादा.'' असे म्हणून तो इसम गेला.

ती नवराबायको जात होती. तो कानांवर गोंगाट आला. तिकडे कसली होती ती गर्दी?

''काय आहे हो तिकडे?'' त्याने एकाला विचारले.

''कळमसरची यात्रा होती. आज संपली. आता मुलेबाळे शिटया वगैरे घेत आहेत. यात्रेतील मुख्य भाग कधीच संपला. मी अशा यात्रांत कधी जात नसतो. सारी फसवाफसवी असते. पूर्वी प्रामाणिकपणा असे. आता सगळा खोटा बाजार. कपडा घेतला तर लौकर फाटायचा. मडके घेतले तर लौकर फुटायचे. बैल घेतला तर निकामी निघायचा. म्हैस घेतली तर लौकर आटायची. सारा चावटपणा. मी या यात्रेत कधी काही घेत नाही.'' असे म्हणून तो गृहस्थ गेला.

ती नवराबायको पुढे जात होती. आजूबाजूला अनेक दुकाने होती. यात्रेतील दुकाने. पाल लावून घेतलेली दुकाने. छोटया छोटया तंबूतील दुकाने. कोणी मांडव घालून त्यांत दुकाने थाटली होती. ती बघा त्या बाजूला उपहारगृहे आहेत. तिकडे खानावळी आहेत आणि ही कसली पाटी? हा दारूचा गुत्ता वाटते? पलीकडे ताडीचे दुकान.

तरुणाने त्या दुकानाकडे पाहिले, परंतु त्याची बायको म्हणाली, ''तिकडे नका जाऊ. आपण त्या पलीकडच्या मांडवात जाऊ. तिथे रात्रीची वस्तीला राहू.'' शेवटी ती दोघे त्या मांडवात आली. एका बाकावर बसली. तिने मुलीला प्यायला घेतले. पिता पिता ती मुलगी झोपली. आईने एका चौघडीवर तिला ठेवून जरा थोपटले. त्या तरुणाने काही खायला विकत घेतले. दोन द्रोणांतून एक प्रकारची खीर त्यांना देण्यात आली. दोघे ती खीर खात होती. त्याने पटकन् संपवली. तेथल्या दुकानाची मालकीण एक पोक्तशी बाई होती. ती डोळे मिचकावीत होती. आपल्या त्या तरुणाचे तिच्या डोळयांकडे लक्ष गेले. तिने खूण केली. तो उठला. आपला द्रोण घेऊन गेला. तिने बाजूच्या एका मडक्यांतून काही तरी ओतले. आपला द्रोण क्षणात त्याने रिकामा केला. पुन्हा त्याने द्रोण पुढे केला. पुन्हा तो भरण्यात आला. आणि पुन्हा रिता झाला. एक, दोन, तीन, चार, द्रोणांवर द्रोण तो पीत होता.

''पुरे आता. पिऊन का मरायचे आहे?'' त्याची बायको रागाने म्हणाली.

''मरेन; मी वाटेल ते करीन. तू कोण बोलणारी? गप्प बस. तुला पाजू का थोडी? आणू द्रोण भरून? परंतु तुला माझ्या हातचा मार आवडेल. हे अमृत नाही आवडणार.'' तो म्हणाला.

 

पुढे जाण्यासाठी .......

दुर्दैवी