बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

दुर्दैवी

हेमा- हेमंताबरोबर आपणही मूकपणाने, गंभीरपणाने तो कागद वाचू या.

''रंगराव सुनीत याचे मृत्यूपत्र''
१. हेमाला माझ्या मृत्यूची वार्ता कळविण्यात येऊ नये. माझ्यासाठी तिला दु:ख नको.
२. मला नेहमीच्या स्मशानात नेऊ नये. कोठे तरी अनाथाप्रमाणे मला मूठमाती द्यावी.
३. माझ्यासाठी भटजी नको, विधी नको, प्रार्थना नको, काही नको.
४. माझा मृतदेहही कोणाला पाहू देऊ नये.
५. माझ्या प्रेताबरोबर दु:ख करायला कोणी नको, अश्रू ढाळणारे कोणी नको.
६. माझ्या शवावर फुले उधळू नयेत. मला मूठमाती देण्यात येईल तेथे कोणी दगड बसवू नका. झाड लावू नका.
७. कोणीही माझी कधी आठवण करू नये.

सही
रंगराव सुनीत''

''हेमा, काय करायचे?'' हेमंत जड स्वरात म्हणाला.

''हेमंत, त्या शब्दांत केवढी निराशा आहे, केवढी करुणा आहे! माझे सारे चुकले, अरेरे!'' तिचे डोळे भरून आले. तिला अश्रू आवरेना. परंतु डोळे पुसून ती म्हणाली.

''शेवटी मृताची इच्छा आपण पवित्र मानलीच पाहिजे. अरेरे! त्यांची नीट क्रियाही आपण करू शकत नाही. अश्रू ढाळीत त्यांच्या प्रेताबरोबर जाऊ शकत नाही. दोन अश्रू नि चार फुले त्यांच्या मृत शरीरावर वाहू शकत नाही. लहानसे स्मारक उभारू शकत नाही. अरेरे! येथून निमूटपणे जाणे हाच मार्ग!''

त्यांनी लखूला पैसे दिले. त्याला सारे समजावून भरलेल्या अंत:करणांनी हेमा-हेमंत निघून गेली.

हेमा आता शांत आहे. त्या घटनांनी तिला एक प्रकारे अकाली प्रौढत्व आले आहे. तिचे जीवन गंभीर झाले आहे. ती आनंदी असते, हसते. परंतु त्या वैभवाचा तिला गर्व नाही. स्तुती व निंदा दोहोंच्या पलीकडे ती गेली आहे. थोरामोठयांच्या बायका तिला भेटायला येतात, तिला बोलवतात. परंतु त्यामुळे तिला विशेष काही वाटत नाही. गरीब बाया माणसेही तिच्यावर प्रेम करतात; तिची स्तुती करतात. ती शांत असते.

हेमाची वृत्ती समतोल झाली आहे. अती तिच्या जीवनात नाही. ती जणु स्थितप्रज्ञतेची मूर्ती झाली आहे. भाऊंच्या जीवनामुळे आणि त्या शेवटच्या घटनेने तिचे जीवनच तसे निराळे बनले. मागून पश्चात्ताप करून उपयोग नसतो; वेळीच जपावे, असे ती शिकली. मात्र गोड बोलावे, सहानुभूती दाखवावी, क्षमा करावी, स्वत:च्या सुख-दु:खांना फाजील महत्त्व न देता दुसर्‍यांची सुखदु:खे आधी पहावी. त्यांच्या भावना ओळखाव्या, त्यांच्या जीवनात शिरावे, सर्वांना शक्य तो आशा, आनंद, प्रेम याचा ओलावा द्यावा, वेळीच द्यावा; मागून उपयोग होत नाही, हे ती शिकली. आणि त्याप्रमाणे ती वागत आहे. ती सुखी आहे.

 

पुढे जाण्यासाठी .......

दुर्दैवी