शनिवार, जुन 12, 2021
   
Text Size

मिरी

'तुम्ही निजा ना. आणि मी तुम्हांला हाक काय मारू ?'

'काय बरे हाक मारशील ?'

'कृपाकाका अशी हाक मारू ?'

'हं चालेल. आता नीज.'

आणि मिरी निजली. कृपाराम विचार करीत होता. त्याला झोप येईना. तो आरामखुर्चीवर पडला. खिडकीतून त्याला आकाशातले तारे दिसत होते. आणि मिरी इकडे झोपेत बोलत होती. बडबडत होती.

'आत्याबाईकडे नका हो पाठवू मला परत. मी तुमची आहे. तुम्ही माझे. होय ना ? ठेवा हं तुमच्याजवळ ! कृपाकाका, मला दूर नका हो करू...'

मिरीचे ते शब्द कृपाराम ऐकत होता. ती लहान निराधार मुलगी. तिच्या आत्म्याचे ते विश्वासपूर्ण शब्द होते. कृपारामवर त्या अगतिक मुलीने संपूर्ण विश्वास ठेवला होता. 'कृपाराम ! तू काय करणार ? तू एकटा आहेस. तू गरीब आहेस, परंतु तुझ्या जीवनातही वात्सल्याचा हा नवा आनंद नाही का येणार ? तुला पाहून मिरी हसेल, तुला ती बिलगेल; उद्या तू म्हातारा झालास म्हणजे मिरी तुला आधार देईल. ती तुझी सेवा करील. मिरी तुला जड जाणार नाही होणार. ती बंधन वाटली तरी प्रेमाचे बंधन आहे हे. काय ठरवलेस ? कसला विचार करतोस ? इतके जड काय आहे त्यात ? आपले स्वातंत्र्य जाईल असे का तुला वाटते ? असला स्वार्थी विचार करू नकोस. स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदीपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे कर्तव्य करणे.'

'खरेच. नका हो मला दूर करू. दुष्ट आहे माझी आत्याबाई. मला मारते ती. मी तुमच्याजवळ राहीन. खरेच कृपाकाका.'

पुन्हा ती बोलली. कृपाराम आरामखुर्चीतून उठला. तो मिरीजवळ बसला. मिरीच्या अंगात ताप होता. ती तापात का बोलत होती ? तिच्या आत्म्याला का श्रध्देचा, विश्वासाचा शब्द उत्तर म्हणून हवा होता ?

कृपारामाच्या डोळयांत अश्रू चमकले. त्याने मिरीचा मुका घेतला. तिच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला.

'बाळ, मी तुला अंतर देणार नाही. माझी हो तू. माझ्याजवळ तू राहा. देव तुला सुखी करो !'

 

पुढे जाण्यासाठी .......

मिरी