सोमवार, मे 20, 2019
   
Text Size

आपण सारे भाऊ

सुरगावात दोषी तापाची साथ आली. आणि श्रीधरपंत व सगुणाबाई  दोघे त्या तापाने अंथरुणाला खिळली. औषधोपचार सुरु होते. गावात आता सर्वांनी टोचून घेतले होते, परंतु ज्यांना आधीच तापाने घेरले होते त्यांचे कसे होणार?

‘आई, तू बरी नाही होणार? सांग ना.’  कृष्णनाथ आईला बिलगून म्हणत होता.

सगुणाबाई  तापाने निपचित पडून होत्या. एका खोलीत त्या होत्या. एका खोलीत श्रीधरपंत होते. रघुनाथच्या येरझारा सुरु होत्या.
‘आई, बोल ना ग.’  कृष्णनाथ कळवळून म्हणाला.

‘काय बाळ? मला की नाही खूप ताप आला आहे. फार बोलवत नाही, राजा. थोडं पाणी दे बरं.’

‘आई, मी काय करु म्हणजे तू बरी होशील? तुझी माळ घेऊन जप करीत बसू? राम राम म्हणत बसू? काय करु सांग.’

‘तू जवळ बस म्हणजे पुरे.’

‘तुझे पाय चेपू?’

‘तुला झोप नाही का येत? हात बरा झाला का? दुखत असला तर जरा शेकव, जा. वैनीजवळ कढत पाणी घे मागून. जा, सोन्या.’

‘आई, माझा हात कधीच बरा झाला. शेकवावासुध्दा लागला नाही. वैनी आपला हात शेकवीत बसे. माझ्या हाताला काहीसुध्दा नाही झाले. तुझे पाय चेपू? मला झोप नाही येत. मी एकटा कसा झोपू? तू केव्हा होशील बरी?’

‘आता तू का लहान आहेस? अंथरुण घालावे व निजावे. वैनीला थोपटायला सांगू का?’

‘नको,मी एकटाच निजेन. परंतु तुझ्याजवळ कोण? दादा तिकडे बाबांजवळ बसला आहे. तुझ्याजवळ मी बसतो. पाणी देईन. मोसंबे देईन. बसू ना?’

‘दादा माझ्याकडेही बघत जाईल. वैनीही अधूनमधून उठेल; तू आता झोप जा हो बाळ.’

‘तू लवकर बरी हो.’

‘होईन. लवकर बरी होईन.’

 

पुढे जाण्यासाठी .......

आपण सारे भाऊ