सोमवार, मे 20, 2019
   
Text Size

आपण सारे भाऊ

सगुणाबाईंचा गळा दाटून आला. डोळे भरुन आले. त्यांनी कृष्णनाथाला एकदम पोटाशी घेतले.

‘आई, रडू नकोस.’

‘दादाचे ऐकत जा. वैनीचे ऐकत जा. समजले ना?’

‘हो.’

‘जा, आता पांघरुण घेऊन नीज; बाहेर गार वारा सुटला आहे. पाऊस येईल मोठा वाटतं. ती खिडकी ओढून घे आणि तू जा हो राजा.’

खिडकी ओढून घेऊन कृष्णनाथ गेला. त्याने आज आपले अंथरुण घातले. पांघरुण घेऊन तो पडला. परंतु पुन्हा तो उठला. तो देवघरात गेला. तेथे समई मंदपणे तेवत होती, परंतु एकदम वा-याचा झोत आला व देवाजवळचा दिवा विझला. तेथे अंधारात कृष्णनाथ बसला होता. त्याने हात जोडले होते.

‘देवा, माझी आई लवकर बरी कर. बाबांना लवकर बरे कर.’

अशी प्रार्थना तो करीत होता. लहान मुलाची निर्मळ प्रार्थना प्रभू ती ऐकेल का?
अंधारातून तो बाहेर आला. तो दादा तिकडून आला. दादाचा त्याला धक्का लागला.

‘कोण?’

‘मी, दादा.’

‘अरे येथे काय अंधारात करतो आहेस? दिवा विझला वाटते? का तू मालवलास? खेळत बसला होतास वाटते समईशी? वात पुढेमागे करीत बसण्याची तुला सवयच आहे; जा झोप.’  असे म्हणून त्याने काडी ओढली. त्याने समई लावली. परंतु पुन्हा विझली.

‘आता कोणी विझवली? मीच का?’

‘वात्रटपणे बोलू नकोस, नीघ येथून!’
कृष्णनाथ रडत निघाला. तो वरती पुन्हा आईजवळ येऊन बसला. आईच्या अंगावर हात ठेवून तसाच पडून राहिला.

 

पुढे जाण्यासाठी .......

आपण सारे भाऊ