रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

अभागिनी

‘ती म्हणते, ‘प्रेम, कुठे आहे प्रेम? कूऊ, कूऊ, कुऊ, प्रेम, कुठे आहे प्रेम? कूऊ कूऊ’ असे ती विचारीत आहे.’

‘तू तिला काय उत्तर देशील.’

‘आहे, माझ्या आईजवळ प्रेम आहे. या नव्या आईजवळ प्रेम आहे.’

‘वेडी आहेस तू. चल घरी जाऊ.’

रमाबाईचे प्रेम मिळाल्यापासून सरलेच्या जीवनात फरक पडला. ती नाचू-खेळू लागली, वर्गातील मुलींशी बोलू लागली. त्यांना खाऊ देऊ लागली. ती कधी कधी फराळाचे नेई, इतर मुलींना देई. तिच्या हृदयाचे दार आजपर्यंत जणू बंद होते, हृदयातील झर्‍याच्या तोंडावर जणू दगड होता, परंतु आता दार उघडले होते. झ-याच्या तोंडावरचा दगड दूर झाला होता, दबलेल्या प्रेमळ, कोमल भावना वाहू लागल्या. पिंजर्‍यातील पक्षी मोकळा होऊन नाचू-गाऊ लागला.

रमाबाईंना आता काही दिवस गेले होते.

‘सरले, तुला भाऊ हवा की बहीण?’ विश्वासरावांनी विचारले.

‘भाऊ. बहिणीला भाऊ.’

आणि खरोखरच भाऊ झाला. रमाबाईंना मुलगा झाला. प्रसूतिसदनातून त्या नव्या बाळासह सुखरूप घरी आल्या. सरला बाळाला आंदुळी. त्याला गाणी म्हणे. ओव्या म्हणे. तिचा आनंद आता गगनात मावत नसे. सर्वांपेक्षा ती सुखी होती, आनंदी होती. हा भाऊ जगो, या भावाला आयुष्य कमी न पडो, असे ती सारखी प्रार्थी.

परंतु ती प्रार्थना देवाने ऐकली नाही.

बाळ आजारी पडला, तापाने फणफणला. सरलेच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. ती बाळाजवळ बसून राही. परंतु एके दिवशी वज्राघात झाला. तिचा जीव कासावीस झाला.

‘तू बाळाला हात नको लावूस. तू त्याला घेत असे, खेळवीत असे म्हणून तर तो नाही ना आजारी पडला? खरंच का तुझे हात विषारी आहेत? नको बाई. खरेच नको त्याच्याजवळ तू बसूस. बाळाचे दुखण जिवावरचे दिसते.’ रमाबाई म्हणाल्या.

‘आई, खरेच का नको हात लावू?’

‘खरेच नको. तेसुध्दा असेच म्हणाले.’

सरला ओक्साबोक्सी रडू लागली. तिला हुंदका आवरेना. ती आपल्या खोलीत गेली. खाटेवर पडून राहिली. अश्रू संपत ना. ‘देवा, माझे आयुष्य बाळाला दे. मला अभागिनीला कशाला वाचवितोस? अशी कशी मी? माझा स्पर्श, माझा श्वास जणू विषारी आहे. माझी दृष्टी विषारी आहे. अरेरे ! अशी कशी मी? देवा, ने रे माझे प्राण. बाळाचे वाचव.’ असे ती स्फुंदत स्फुंदत म्हणत होती.
बाळाचे दुखणे त्या दिवशी अधिक होते. ती काळरात्र होती. विश्वासराव व रमाबाई बसून होती. सरला आपल्या खोलीतून डोकावून बघे. बाळाच्या जवळ जाऊन बसावे असे शतदा तिच्या मनात आले. परंतु पुन्हा निराश होऊन ती खाटेवर जाऊन पडे. शेवटी तिने धैर्य केले. ती बाळाजवळ गेली.

‘बाबा बसू का जवळ? मी नाही हो वाईट. माझ्या स्पर्शाने फुले सुकत नाहीत. बसू का बाळाजवळ? बसू का माझ्या भावाजवळ? आई बसू का?’

 

पुढे जाण्यासाठी .......