मंगळवार, जुलै 14, 2020
   
Text Size

अभागिनी

‘तुझ्या पाठीवरचे एकही भावंड वाचले नाही. माझी आईही गेली. हा बाळही आजारी पडला. नको. तू जा. सरले, खरेच जा.’ विश्वासराव म्हणाले.

‘बाबा, मी तेवढी वाईट आणि तुम्ही सारे चांगले वाटते? माझे पाप मारीत असेल तर तुमचे पुण्य का नाही कोणाला तारीत?’

‘तू जा. बाळ घुटमळत आहे. मरणाच्या दारात आहे. येथे वाद घालायला काही वाटत नाही का तुला? जा म्हणतो ना. जा.’ विश्वासराव तीव्र स्वराने म्हणाले.

सरला गेली. आणि थोडया वेळाने बाळही देवाघरी गेला. घरातला आनंद पार मावळला. आता सरलेशी कोणी बोलत नसे. अश्रू फक्त तिचे मित्र होते.

सरला मॅट्रिक पास झाली. पुढे काय?

‘बाबा मला शिकायची इच्छा आहे.’

‘शिकणे पुरे. तुझे लग्न ठरवीत आहे.’

‘माझे लग्न?’

‘हो.’

‘ते कशाला बाबा? मी दुर्दैवी आहे. मी विषारी आहे. एका घराण्याचा मी सत्यानाश करीत आहे. आणखी दुस-या घराण्याचा सत्यानाश कशाला करू? नको. बाबा लग्न नको. माझे विद्येशी लग्न लावा. ज्ञानाशी लग्न लावा. मला नको दुसरा सखा, नको कोणी जिवाचा सोबती. बाबा, लग्नाचा विचार मी माझ्या मनातून कधीच काढून टाकला आहे. एवढे तरी माझे ऐका.’

‘मी ठरवले आहे लग्न. लग्नाशिवाय राहणे बरे नव्हे. केवळ विद्येशी व ज्ञानाशी लग्न लावून भागत नसते. तू या घरात विषवल्ली असशील; कदाचित दुसर्‍याच्या घरी अमृतवल्ली होशील.’

आणि सरलेचे लग्न झाले.

“सरले !”

“काय?”

“तू पुन्हा लग्न कर. लग्न झाले नाही असे समज. तू दु:खी नको राहूस. सुखाचा संसार कर. माझी आज्ञा आहे. माझी प्रार्थना आहे कबूल कर.”


सरला सासरी गेली. तरुण सुंदर पती; परंतु लग्न होऊन पंधराही दिवस झाले नाहीत तोच पती आजारी पडला. घरातील गोडधोड अद्याप शिल्लक होते. लग्नातील लाडू-करंज्या अद्याप होत्या. तोच पती मरणशय्येवर पडला. सरला देवाला रात्रंदिवस आळवीत होती. पतीजवळ ती बसून होती.

रात्रीची वेळ होती. सासूसासरे जरा पडले होते. सर्व झोपली होती. सरला पतीजवळ बसली होती. पती वातात होता. सरला पतीच्या कानात म्हणाली, ‘माझे आयुष्य तुम्ही घ्या. तुमचे मरण मला द्या.’ पतीने डोळे उघडले. भ्रामकपणाने त्याने तिच्याकडे पाहिले. पुन्हा तो डोळे मिटून पडला. काही वेळाने त्याने हाक मारली,

 

पुढे जाण्यासाठी .......