गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

अभागिनी

“का असे करता दु:ख? हे पहा रक्त घळघळत आहे. माझा हा रूमाल बांधतो.”

त्याने रक्त पुसले. रूमालाची पट्टी करून ती पाण्याने भिजवून त्या जखमेवर त्याने बांधली. तो तेथे जवळ बसला. कोणी बोलत नव्हते. रात्र होऊ लागली. अंधार पडू लागला.

“तुम्ही कोठे राहता? चला. मी तुम्हाला पोचवतो. पुढे टांगा भेटला तर करू. घरी का त्रास आहे? तुम्ही किती वेळ रडत होतात. मी पाहात होतो. अश्रू पुसायला आधी आलो नाही. संकोच वाटे. परंतु तुम्ही डोके फोडू लागल्यावर थांबवेना. संकोच गेला. मी धावत आलो. क्षमा करा. राग नका मानू. कोणते तुम्हाला आहे दु:ख? तुम्हाला का कोणी प्रेमाचे नाही?”

“काय सांगू? मी एक अभागिनी आहे. माझी आई मेली. माझी सारी भावंडे मेली. पती मेला. मी सर्वांचा संहार करणारी आहे. बाबा मला विषवल्ली म्हणतात. सावत्र आई मला पांढ-या पायांची म्हणते. सासूसासरे मला परत घरी घेत नाहीत. मी येथे बाबांकडे आहे. परंतु कोण आहे मला? मला कोणी नाही ! सहानुभूती, प्रेम, ओलावा, दया, गोड शब्द, सर्वांना मी पारखी आहे. मी वाईट आहे. अरेरे ! देवाने मला जिवंत का ठेवावे? तुम्ही जा. तुमच्यावर माझी विषारी सावली पडेल. तुमचाही सत्यानाश होईल. जा पळा.”

“तुम्ही निराश आहात. असे एखाद्याच्या पायगुणाने मरण येत नसते. असल्या भोळसट कल्पना आज कोणी मानील? आम्ही सुशिक्षित तरूण तरी अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. काही तरी कारण होते. मरण येते. शरीरात बिघाड होतो, रोग होतो व प्राण जातात. कोणाच्या पायगुणाचा संबंध? तो पहा एक मुंगळा तुमच्या पदरावर. तो काही तुमच्या स्पर्शाने मेला नाही. हा मुंगळा मरत नाही, मग माणसे का मरावी? सारा वेडेपणा आहे. असे नका मनात आणू. दु:खामुळे, अज्ञानामुळे कोणी तसे म्हणत असतील. तुम्ही ते मनावर नका घेत जाऊ. त्यांच्या अज्ञानाची कीव करा.”

 

पुढे जाण्यासाठी .......