मंगळवार, मे 26, 2020
   
Text Size

बाळ, तू मोठा हो

“सरला ! खरेच सरला आहे. कशी बोलत बसली, दु:ख सांगत बसली. अभागिनी ! सरळ माणसे का जगात दुर्दैवी असतात? सरळ माणसांच्या नशिबी का दु:खच असते? सरला सुखी नाही का होणार? ती का जीव देईल? ती दु:खी आहे, निराश आहे. मी नाही का तिला आशा देऊ शकणार? मी नाही का तिला सहानुभूती दाखवू शकणार? परंतु ती कोठे राहते? पुन्हा भेटेल का? तिने मला बरोबर येऊ दिले नाही. अभागिनीबरोबर नका येऊ असे म्हणाली. ती त्या कालव्याच्या काठी भेटेल का पुन्हा? तिच्या जीवनात मला आनंद निर्माण करता आला तर?”

अशा विचारात तो होता आणि अंथरुणावर पडला. हळूहळू सरला दूर होऊन त्याला आईची मूर्ती दिसू लागली.
“उदय, आईला सुखव. ती माऊली वाट पाहात आहे. बाळ, लौकर मोठा हो, माझे कष्ट दूर कर, हे तिचे शब्द का विसरलास? सरलेचे अश्रू तू पाहिलेस, परंतु तुझी आई आज किती वर्षे तुझ्यासाठी रडत आहे. तिचे अश्रू विसरू नकोस.” असे त्याचे हृदय सांगत होते. आईचा विचार करता करता त्याला झोप आली आणि त्याला दोन स्वप्ने पडली. सरला जवळ येऊन बोलत आहे.

“तुम्ही द्याल का मला प्रेम? तुम्ही व्हाल का माझे? मला कोणी नाही, कोणी नाही. कशाला पुसता रक्त? माझ्या हृदयाच्या जखमा प्रेमाचे अमृतांजन लावून बर्‍या करणार नसाल, तर हे रक्त तरी कशाला? हे डोके आपटा. शतचूर्ण करा. नाही तर ते तुम्ही आपल्या मांडीवर घ्या. ते थोपटा. मला जीवन तरी द्या नाही तर तुमच्या हाताने मरण तरी द्या. तुमचे प्रेम नसेल मिळायचे तर तुमच्या हातून मोक्ष तरी मिळो.”

असे सरला बोलत होती. तो स्वप्नातून जागा झाला. परंतु पुन्हा झोपला. आणि पहाटे त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. मातेची मंगलमयी मूर्ती त्याला दिसत होती. कृश मूर्ती. जन्मभर कष्ट करून थकली-भागलेली मूर्ती.

“बाळ, कधी रे मोठा होशील? कधी मला विश्रांती देशील? कधी सुखाने तुझ्याजवळ मी बोलत बसेन? लौकर मोठा हो. चांगला हो. आईला सुखव. सुखवशील ना?” असे माता संबोधीत होती. आणि तो जागा झाला. बाहेर उजाडले होते. आईचे शब्द त्याच्या कानांत घुमत होते, “बाळ, लौकर मोठा हो. चांगला हो.

 

पुढे जाण्यासाठी .......