बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

प्रेमाची सृष्टी

झिमझिम पाऊस पडत होता. हवेत गारवा होता. सायंकाळची वेळ होती. फिरायला जाणारे बाहेर पडले होते. कोणाजवळ छत्री होती. कोणाजवळ नव्हती. विशेषत: तरुण मंडळी छत्री न घेताच जाताना दिसत होती. तोंडावरचे पाणी हातरूमालाने पुशीत होती. उदयही मधूनमधून तोंड पुशीत, केसांवरून रुमाल फिरवी. पर्वतीच्या पायथ्याच्या रस्त्याने तो जात होता. कालव्याकडे तो वळला. त्याच्या काठाने तो जाऊ लागला. तो दोनतीनदा त्या बाजूला येऊन गेला होता. परंतु इष्टदर्शन झाले नव्हते. “आज तरी सरला दिसेल का? या अशा हवेत ती फिरायला पडेल का बाहेर? ती आजारी तर नसेल ना? पुन्हा डोके फोडून नसेल ना तिने घेतले? ती आजारी पडली असेल तर तिची काळजी कोण घेईल? पिता दुराग्रही व आई सावत्र. दोघांचे तिच्याविषयी दुष्ट मत झालेले. गरीब बिचारी !” असा विचार करीत तो जात होता.

तो त्याला कोणीतरी दिसले. छत्री उघडून तिच्या खाली बसलेले कोणीतरी दिसले. सरलाच ती ! त्याचे तरल हृदय नाचू लागले. त्याची बोटे थरथरत होती. जणू ती हृदयतंद्रीला छेडीत होती. तो जवळ आला. सरला आपल्या भावसमाधीत होती.

“सरले !”

तिने वर पाहिले नाही. तिचे लक्ष नव्हते. प्रेमाने हळुवारपणे मारलेली ती हाक तिला ऐकू आली नाही. तिच्या हृदयातही का संगीत सुरू होते? त्यामुळे का ती इतकी तन्मय झाली होती? उदयने खिशातून सरलेचा तो रुमाल काढला. घडी केलेला स्वच्छ रुमाल. त्याला का वास येत होता? त्याला त्याने अत्तर लावले होते. कोठले अत्तर? हृदयातील अत्तरदाणीमधले का? उदयने तो रुमाल हळूच सरलेच्या अंगावर टाकला. ती दचकली. ती भानावर आली. तिने बाजूस पाहिले तो उदय !

“तुमचा रुमाल द्यायला आलो होतो.”

“मी तो विसरूनही गेल्ये होत्ये.”

“खरेच?”

“तो मला परत मिळावा अशी माझी इच्छा नव्हती. तुमचा रुमाल माझ्या जवळ आहे.”

“तो फाटका रुमाल?”

“त्या फाटक्या रुमालाने फाटलेले हृदय तुम्ही शिवले !”

“सरले !”

“माझे नाव तुम्हाला काय माहीत?”

“खोल पाहतो, नीट पाहतो, त्याला दिसते; सारे कळते.”

“खरेच कसे कळले तुम्हाला नाव?”

“या रुमालाने सांगितले.”

 

पुढे जाण्यासाठी .......