शनिवार, मे 30, 2020
   
Text Size

प्रेमाची सृष्टी

ती खाली उतरली. खिडकीजवळ ती उभी होती. तिच्या डोळयांत पाणी आले.

“उदय !”

“वाईट नको वाटून घेऊ. आईला बरे वाटताच मी येतो. मी पत्र पाठवीन.”

“तू का सारे सामान बरोबर घेतलेस?”

“हो.”

“थोडे ठेवलेस का नाही? मी त्या खोलीत राहिल्ये असत्ये.”

“खोली कोणाला देऊ नकोस म्हणून भैय्याला सांगितले आहे. अजून खाट तेथेच आहे. भय्याने काढली नसेल.”

“मी तेथे आत जाईन. किल्ली माझ्याजवळ आहे. तुझेच कुलूप आहे ना?”

“हो. माझी किल्ली भैय्याजवळ आहे.”

शेवटची घंटा झाली. सरलेने उदयकडे अश्रुपूर्ण डोळयांनी पाहिले. दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते. दोघांनी ते दाबले.

“उदय, ये हो लौकर.”

“विश्वास ठेव.”

शिट्टी झाली, गाडी गेली. सरला थोडा वेळ तेथेच प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसली. तिला हलके वाटत होते. जरा निराधार, अगतिक वाटत होते. उदयच्या आईविषयीही तिला काळजी वाटत होती. शेवटी ती उठली. ती टांगा करून उदयच्या खोलीवर आली. तिने खोली उघडली. दार लावून आतील खाटेवर ती बसली. तिच्या डोळयांतून सारखे पाणी येत होते. उदयने सारे सामान का बरे नेले? तो पुन्हा नाही का येणार? येईल. आणि न आला तर? तो माझ्या जीवनात आहे. माझ्या पोटात वाढत आहे. माझ्या अणुरेणूंत तो अंतर्बाह्य भरलेला आहे. खरेच, उदय न आला तर? तर मी जगात कोठेही जाईन. बाळाला वाढवीन. बाळाला त्याच्या प्रेमळ पित्याच्या गोष्टी सांगेन. परंतु उदय येईलच. आणि माझे कायमचे दुर्दैव आड आले तर? मी जन्मजात अभागिनी आहे. मी विषवल्ली आहे. बाळाला का त्याचा जन्मदाता दिसणार नाही? माझ्या पोटी येणारे बाळ, तेही का दुर्दैवी असेल? या अभागिनीचे बाळही अभागी होणार का?

तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. परंतु शेवटी श्रध्देचा; आशेचा, विश्वासाचा विजय झाला. ती आनंदाने घरी आली. तिने ट्रंकेतून तो दोघांचा फोटो काढला. तिने तो हृदयाशी धरला. तो फोटो जवळ घेऊन ती अंथरूणावर पडली. तिला एकदम हसू आले. कशाचे बरे? तिच्या मनात आले की, हा दोघांचाच फोटो आहे. परंतु पुढे तिघांचा काढावा लागेल. आणि बाळ कोणाच्या हातात असेल? उदयच्या की माझ्या? अशा सुखमय व धन्यतम विचारांत, मातृत्वाच्या वत्सल कल्पनासृष्टीत ती रमली, रंगली. आणि केव्हा झोप लागली ते तिला कळलेही नाही.

नीज, सरले नीज. तुझा प्रेमाचा वृक्ष बहरला, फुलला. आता तो लौकरच सुंदर फळही देणार आहे. झोप. सुखाने झोप. विश्वासाने झोप. शेवटी विश्वासाचा विजय होईल. शांतपणे झोप.

 

पुढे जाण्यासाठी .......