शुक्रवार, जुन 05, 2020
   
Text Size

प्रेमाची सृष्टी

“तरीच ही घाण लागली आहे. ही बघ जळमटे लागली आहेत. तेथे कोठे लपलीस? येथे कोपर्‍यात नाही तर दाराआड लपायचे किंवा हे पांघरूण घेऊन लपायचे? किती घाण लागली बघ.”

“ती घाण नाही. या खोलीतील सारे सुंदर आहे. सारं सुगंधी आहे. अरे, झाडू नको, नको झटकू. उदय, तुझी खोली नीट झाडू का?”

“मी झाडीन मग.”

“तुला वाचायला जायचे आहे ना?”

“थोडया वेळाने जाईन.”

“तू जा मी येथेच बसेन.”

“एकटी बसून कंटाळशील.”

“कंटाळा आला तर निघून जाईन. तुझ्याजवळ दोन किल्या आहेत का?”

“दुसर्‍या किल्लीची आजपर्यंत जरूर पडली नव्हती. परंतु ट्रंकेत आहे ती तुला देतो.”
त्याने ट्रंक उघडली. ती किल्ली सापडली. त्याने ती सरलेला दिली.

“सरले, तुला काय देऊ? मी चहा पीत नाही, दूध घेत नाही. मी गरीब आहे. गरीब आईचा मी मुलगा आहे.”

“मला काही नको.”

“लवंग देऊ? ही घे.”

तिने लवंग खाल्ली. ती शांतपणे बसली होती. तिला एक जांभई आली. पुन्हा दुसरी आली.

“झोप नाही आली वाटते काल? नाही आली?”

“रात्रभर या रुमालावर मी प्रेम गुंफीत होत्ये.”

“इतकी घाई काय होती?”

“जीवनात दिरंगाई नको. घाईच बरी. प्रेमाच्या राज्यात घाईच बरी. प्रेमाची फुले पटकन टिपून घ्यावी, वेचून घ्यावी. पुन्हा मिळतील, न मिळतील. वसंत ऋतू का नेहमी राहतो?”

“तू उजाडता आलीस. वडील विचारतील.”

“सांगेन की आजपासून सकाळी फिरायला जाण्याचे ठरविले आहे.”

“तू का रोज येणार? इतक्या लांब?”

“रोज नको येऊ?”

“लांब आहे म्हणून म्हटले.”

“परंतु तुला नाही ना कंटाळा?”

“मला सकाळी वाचायला जायचे असते.”

“मधूनमधून मी येईन. भूक लागली म्हणजे येईन. राहवले नाही तर येईन. म्हणजे झाले ना?”

“मी आता जातो. तुझ्या डोळयांवर झोप आहे, सरले. नीज येथे हवी तर.”

“तू जा. मी बघेन काय करायचे ते.”

“जाऊ? तो रुमाल दे ना?”

“हा घे.”

 

पुढे जाण्यासाठी .......