शनिवार, मे 30, 2020
   
Text Size

प्रेमाची सृष्टी

“प्रियतमा,

तू नुसते सरले असे लिहिलेस. पुरूष आपल्या भावना संयमाने सूचित करतात. परंतु मी तुला नि:संकोचपणे प्रियतमा अशी हाक मारीत आहे. अज्ञातपणे तुलाच जणू मी इतके दिवस मुक्या हाका मारीत होत्ये. जीवनातील घोर निराशेच्या वेळेस माझ्या जीवनात तुझा उदय झाला. त्या उदयाचा अस्त न होवो.

मी खरेच तुझी झाल्ये आहे. मी माझी वेल तुझ्या जीवनाच्या मांडवावर सोडली आहे. ही वेल वाढव, फुलव, फळव. या वेलीला प्रेमाचे खत घाल. आपुलकीचे पाणी घाल. कोमल वेल. हिच्यावर उपेक्षेची वीज न पडो. हिच्यावर निराशेचे निखारे न सांडोत. आजवर मी खूप रडले. आता मला हसव. बाबा मला विषवल्ली म्हणतात. तुझ्या दारात ती अमृताची ठरो. तुझ्या प्रेमळ कटाक्षांनी, प्रेमळ स्पर्शांनी ती अमृतमय होवो. रसमय होवो.

उदय, तुला काय लिहू? या तुझ्या लहानशा खोलीत मी बसले आहे. जणू सुखाच्या स्वर्गात आहे. येथील प्रत्येक वस्तूचा मी वास घेतला. उशीवर डोके ठेवले. पांघरुण घेऊन निजले. तुझी पुस्तके प्रेमाने हाताळली. येथील प्रत्येक वस्तू मला प्रिय वाटत आहे. खाटेखालचा पातळाला लागलेला कचराही कस्तुरीसमान वाटत आहे.

तू माझा आहेस. होय माझा आहेस आणि मीही तुझी आहे. खरंच आपण एकमेकांची होऊ. तुला मी व मला तू. तुझ्यामुळे माझे दु:ख गेले. जगावे असे वाटू लागले. तुझ्यामुळे मी माझ्या हृदयमंदिरात पुन्हा मांडामांड करू लागले आहे. तेथे बैठक घालीत आहे. चौरंग मांडीत आहे. दिवा लावीत आहे. फुले जमवीत आहे. ये, राजा ये. हृदयरमणा, ये. या आसनावर बस. या मंदिरात ये. या मंदिरात आजपर्यंत मूर्ती नव्हती. तू येथे ये. पडके मंदिर सजू दे. तेथे आरती, पूजाअर्चा सुरू होऊ दे. पुन्हा मला निराशेच्या दरीत नको लोटू. ही स्वप्ने क्षणिक न ठरोत. हे मृगजळाचे आभास न ठरोत, हे बुडबुडे न ठरोत. हे चिरमीलन होऊ दे. अखंड प्रेमाची मंदाकिनी वाहू दे. हा झरा न सुको, न आटो. हे प्रेमाचे फुल न सुको, न गळो, न म्लान होवो. अनसूयेने सीतेच्या केसांत फुले घातली होती, ती कधी कोमेजली नाहीत. तशी तुझ्या माझ्या हृदयांत फुलणारी ही प्रेमाची फुले सदैव घवघवीत राहोत.

मी जाते हं. तुझे पत्र मी वाचले म्हणून रागावू नकोस. हे उत्तर वाचून जर राग आला असला तर दूर होवो. आणि आलाच राग तर माझ्या डोळयांतील करूणा बघून तो जाईल.

--तुझी सरला.”

ते पत्र ठेवून सरला उठली. तेथील पाणी पिण्याचे भांडे व तांब्या घाण होती. तिने ती भांडी स्वच्छ घासून ठेवली. ती निघाली. कुलूप लावून किल्ली घेऊन निघाली.

असे त्यांचे प्रेम वाढत होते. दोघांना अपार आनंद होत होता. दोघांना खूप उत्साह वाटत होता. सरला अकस्मात त्या खोलीवर येई, खोली उघडी. तेथे फुले ठेवी, खोली नीटनेटकी करून जाई. कधी दोघांची भेट पडे. कधी दोघे फिरायला जात ! एकत्र बसत, बोलत. कधी मुकी असत. कधी दोघे सारखी असत.

“तू हसतेस किती सरले?” एकदा उदय म्हणाला.

 

पुढे जाण्यासाठी .......