गुरुवार, जुन 04, 2020
   
Text Size

आई गेली

आता उजाडले. नेण्याची तयारी सुरू झाली. मंडळी जमली. उदयने अश्रू पुसले. आईचे पाय धरून तो बसला होता. त्याचे डोळे मिटलेले होते. त्याचा आत्मा का आईच्या आत्म्याला भेटायला जात होता?

“उदय, चल बाळ. ऊठ.” मामा म्हणाला. उदयने हातात मडके धरले. मंडळी निघाली. उदय गंभीर होता. एक एक अश्रूही आता येत नव्हता. आणि स्मशानात मंडळी आली. सरण रचण्यात आले. मातेचा देह ठेवण्यात आला आणि अग्नी देण्यात आला.

उदय उभा होता. मातेचा देह भस्म होत होता. आणि उदयचे हृदय भाजून निघत होते. तो पाहात होता. तो त्या ज्वाळा पाहात होता. धडधडत वर जाणार्‍या ज्वाळा ! उदय, काय पाहतोस? कशाचा विचार करतोस? या ज्वाळा माझ्यातील मालिन्य नष्ट करोत असे का का तू म्हणत आहेस? मातेची क्षमा का तू मागत आहेस? अरे जगाजवळ क्षमा मागावी लागते. आईजवळ रे कसली क्षमा मागायची? मुलाने आईजवळ क्षमा मागितली तर आईला कसेसेच होते. मुलाने आईजवळ जावे, तिला बिलगावे. आईने कधीच क्षमा केलेली असते. तिला तुमच्या प्रेमाची अपेक्षा असते. उदय, असा काय बघतोस? पुढे पुढे कोठे जातोस? उदय आगीत उडी घेणार की काय? तो पाहा चालला. परंतु मामाने त्याला एकदम ओढले.

“उदय, हो मागे. वेडा कुठला.” मामा म्हणाला. मामाने धरले. परंतु मामांचा हात सुटताच उदय तेथे जमिनीवर धाडकन पडला. सारे धावले. कोणी पाणी आणले. कोणी काही केले, परंतु उदयला शुध्द येईना.

एकजण गावात धावत गेला. तो मोटार घेऊन आला. मोटारीपर्यंत उदयला उचलून नेण्यात आले. मोटारीत घालून त्याला घरी आणण्यात आले. डॉक्टर आला. त्याने तपासले व इंजेक्शन दिले.

थोडया वेळाने उदयने “आई” अशी हाक मारली.

“उदय-” मामांनी हाक मारली.

“आई, मी तुझ्याकडे येतो. अशी नको पाहूस. आई, येऊ दे आम्हांला. आम्हा दोघांना येऊ दे, आई, आई !”

उदय वातात होता.

“उदय-” मामा हाक मारीत होते.

उदयला नीट शुध्द येईना, स्मृती येईना. एके दिवशी त्याला घेऊन मामा वर्‍हाडात निघून गेले. जळगावचा खेळ संपला.

मामांकडे उदय खाटेवर पडून असतो. “आई कोठे आहे? आई, आई गेली ! गेली आई. सरले, आई गेली. अरेरे ! आई गेली. संपले सारे. आई गेली.” एवढेच तो म्हणत असतो. कधी येईल त्याला स्मृती? कधी येईल शुध्द?

 

पुढे जाण्यासाठी .......