बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

पंढरपूर

सरला सचिंत होती. उदयचे गेल्यापासून पत्र नाही. ती रोज वाट पाही. आज येईल, उद्या येईल. परंतु महिना झाला तरी पत्राचा पत्ता नाही. मे महिना संपत आला आणि जून उजाडला. मृग नक्षत्र सुरू झाले. पावसाळा आला. परंतु उदय आला नाही. कोठे आहे उदय? काय झाले त्याचे? त्याची आई का बरी नाही? त्याची व आईची भेट नसेल का झाली? परंतु तो कोठे आहे? त्याचा पत्ताही माझ्याजवळ नाही. इतके दिवस आम्ही एकत्र होतो. भेटत होतो. बोलत होतो. परंतु त्याचा पत्ता नाही घेऊन ठेवला. कोठे त्याला पत्र लिहू? कोठे त्याला पाहू? कोठे शोधायला जाऊ? उदय, तू का माझी उपेक्षा केलीस? तू माझा त्याग का केलास? शक्य तरी आहे का हे? गोड बोलणारा, प्रेमळ हसणारा तो उदय कोठे आहे? अशी माणसेही का फसवतील? ते सुंदर डोळे का फसवतील? कसे उदयचे डोळे? जणू प्रेमस्नेहाची सरोवरे ! किती पाणीदार ! सतेज परंतु गोड ! ते डोळे केवळ अमृताने भरलेले वाटत. मृतांनाही ते डोळे जिववतील असे वाटे. प्रभू रामचंद्रांनी मृत वानरांकडे नुसते पाहिले आणि ते सजीव होऊन उठले. जखमी वानरांकडे त्यांनी पाहिले आणि त्यांच्या जखमा भरून आल्या. माझ्या उदयचे डोळे असेच आहेत. तो माझ्याकडे पाही व माझ्या शतजन्मांच्या वेदना बर्‍या होत, जखमा भरून येत. उदय, माझ्या हृदयाच्या श्रीरामा, मला का तू फसवशील? परंतु प्रभू रामचंद्रांनीही सीतेचा त्याग केला. ज्या डोळयांत मृतांना सचेतन करण्याचे सामर्थ्य होते अशा त्या डोळयांनी सीतेला फसविले. लक्ष्मणाकडून रानात तिला नेऊन सोडले. उदय, तूही का सरलेला फसवून सोडून दिलेस? सीतादेवीला करुणासागर वाल्मीकि भेटला. मला रे कोण भेटेल?

अजून विश्वासराव परत आले नव्हते. परंतु लौकरच ते येणार होते. रमाबाईंचा बाळ चार महिन्यांचा झाला होता. रमाबाई बाळाला घेऊन येणार होत्या. काय करावे ते सरलेला समजेना. आज घरात ती रडत बसली होती. उदयचा व तिचा तो फोटो, तो तिच्या हाती होता. त्या फोटोजवळ ती बोलत होती :

“उदय, तू माझ्या कपाळावर कुंकू लावलेस. या फोटोत बघ ते कुंकू आहे. तू मला सनाथ केलेस. परंतु कायमचे कुंकू कधी रे लावणार? का तू लावलेले कुंकू मी मागून पुसले म्हणून रागावलास? ते तसेच मी का नाही ठेवले, रोज का नाही लावू लागले, असे तुला वाटले? मला नाही रे ते धैर्य. ज्या दिवसापासून तू मनाने माझा झालास, मी मनाने तुझी झाल्ये त्या दिवसापासूनच मी कुंकू लावले पाहिजे होते. परंतु लोकांची लाज वाटे, भीती वाटे. लाज घरच्यांची वाटे. उदय मी काय करू? तू म्हणशील, जेथे लाज आहे. भय आहे, तेथे कोठले प्रेम? माझ्या हृदयात डोकावून तरी बघ. तेथे तू आहेस. तुझे सारे राज्य. तुझे साम्राज्य. तेथे तुझे सिंहासन. तेथे फक्त तुझी पूजा, तुझी आरती, तुझी शेजारती. उदय, कधी येशील, कधी पत्र तरी लिहिशील, माझी वास्तपुस्त घेशील? तुझ्याशिवाय मला कोणी नाही. ना कोणाचा आधार, ना आसरा. तुला का हे माहीत नाही? सारे माहीत असूनही का येणार नाहीस? अरेरे ! उदय, इतका का तू कठोर असशील? तू का दगड आहेस, केवळ दुष्ट आहेस? तू का केवळ माझी विटंबना करण्यासाठी आलास? तू का केवळ फुलपाखरू?

परंतु मी तुला कशाला नावे ठेवू? मीच दोषी, मीच अपराधी. मीच तुला अधिकाधिक ओढले. तू आलास. परंतु ओढणारी मी, मीच तुला दिवाळीत घरी आणले. मीच तुझ्याकडे यायची, रमायची, तुला ओढायची. ते येत असस. निमूटपणे येत असस. माझी करूणा म्हणून का येत असस? म्हणून का माझ्याजवळ राहात असस? मग ती करूणा आता कोठे आहे? का “मला करूणा नको, प्रेम असेल तर दे” असे मी म्हटले म्हणून तू निघून गेलास?

किती तुझ्या आठवणी ! मी तुझ्या हातावर लिहायची, “मी तुझी, मी उदयची !” मी तुझ्या हातावर लिहून विचारीत असे, “मी कोणाची?” तू माझ्या हातावर लिहीत असस, “माझी”- हा बघ     माझा हात. तुझी अक्षरे तेथे मला दिसत आहेत. “तू माझी” असे तू मला म्हटलेस, असे हातावर लिहिलेस आणि आज कोठे रे तू आहेस? मी तुझी ना? मग ये ना, मग ये ना धावत, ने ना मला, घे ना हृदयाशी. उदय, मी तुला नेहमी म्हणायची, “धर रे मला हृदयाशी. घे रे जवळ. कधी धरशील मला हृदयाशी?” तू हसून म्हणायचास, “धरीन, एक दिवस धरीन.” मी विचारायची, “या जन्मी का पुढच्या जन्मी?” तू थापट मारून म्हणस, “याच जन्मी, याच डोळा.” आणि एके दिवशी खरोखर तू मला हृदयाशी धरलेस. त्या तापात. आठवते का तुला? तू झोपेत असताना मी तुला हृदयाशी धरले. आणि झोपलेल्या सरलेला तू हृदयाशी धरलेस. आपण जणू प्रेमात न्हालो. डुंबलो. हे बघ माझ्या अंगावर रोमांच येत आहेत, त्या अनंत प्रेमाच्या स्मृतीचे. उदय, या का सार्‍या स्मृतीच राहणार? या स्मृतींवरच का केवळ आता जगू? केवळ स्मरणाचा चारा नाही रे मला पुरणार. संत म्हणतात, की रामनामाचे अमृत पुरे. मी का नुसते “उदय उदय” म्हणत बसू? तेवढयाने नाही रे भागणार.

 

पुढे जाण्यासाठी .......