शनिवार, मे 30, 2020
   
Text Size

पंढरपूर

उजाडतच एक गाडी होती. सोलापूरकडे जाणारी. ती त्या गाडीत बसली. आणि गाडी निघाली. स्टेशनावर कोठे उदय दिसतो का हे ती पाहात होती. त्या कालव्याच्या काठी पर्वतीच्या बाजूस कसा अकस्मात धावून आला ! आज नाही का येणार? उदय, कोठे रे तू आहेस? का तू आजारी आहेस? तू माझ्या वडिलांकडे आलास तर, ते काय सांगतील? मी बाबांना कळवून ठेवू का? नको. देवाची इच्छा असेल तसे होईल.

गाडी जात होती. ती जुनी पत्रे वाचीत बसली होती. पुण्यास असताना उदयने लिहिलेली पत्रे. त्यांत तेही एक पत्र होते.

“तू मला विसरून जा.” खरेच का मला विसरून जाण्याची त्याची इच्छा होती? परंतु मी बळेच त्याला गुंतविले. फसविले. अडकवले. उदय, तुझा नाही दोष. माझ्या मोहाची फळे मला भोगू दे. माझ्या प्रेमाची फळे मला भोगू दे. हे का दु:ख आहे? मी हे दु:ख का मानू? माझ्या मोहाची फळे असे का म्हणू? माझे प्रेम का क्षुद्र आहे? उदयसाठी मी मरेन, सर्वस्व सोडीन. वाईट केल्याचे हे दु:ख नाही. फक्त जगात नीट राहता येत नाही. लोक नाके मुरडतील, मला कोणाचा आधार नाही, याचे वाईट वाटते. मी केले ते वाईट असे मला वाटत नाही. उदय माझा आहे. मी त्याच्या चरणी जीवन दिले आहे. त्याने दिलेला प्रसाद माझ्याजवळ आहे. परंतु हा प्रसाद माझ्याजवळ कोठे राहणार आहे? तो पंढरपूरला ठेवूनच मला कोठे तरी भटकत जावे लागेल ! बाळाला जवळ घेऊन नाही का जाता   येणार? भिकारणी पोटाशी पोर बांधून हिंडतात. मी नाही का हिंडणार? परंतु भिकारणीबरोबर तिचा पतीही असतो. त्या भिकारपणातही त्यांना एकमेकांचा आधार असतो. मला कोण?

पुन्हा पत्र वाचताना ती रमली. आठवणीत रमली. मी उदयला म्हणायची, “उदय, समक्ष आपण भेटतो, बोलतो. मग पत्रे कशाला देतोस?” तो म्हणायचा, “समक्ष सारे बोलता येत नाही. समोरासमोर जणू संकोच होतो. लाज वाटते. परंतु पत्र लिहिताना हृदय मोकळे होते. आणि पत्र पुन:पुन्हा वाचायला मिळते. बोललेले शब्द सारे थोडेच लक्षात राहतात? परंतु समग्र पत्र जवळ ठेवता येते. पत्र म्हणजे आठवण, भेट. जणू आपण आपले हृदय काढून देत असतो. पत्र म्हणजे हृदयाचा भाग. हृदयाची पाकळी.” आणि मीही नसे का त्याला पत्रे देत? मीच नेहमी लिहायची. उगीच काल्पनिक शंका घ्यायची. उदय, तुझे नाही हो माझ्यावर प्रेम असे म्हणायची. आणि एकदा दु:खाने मग तो म्हणाला, “तुला असेच वाटत असेल तर माझा नाइलाज आहे. माझे दुर्दैव. अजूनही तुला असेच वाटत असेल तर मी काय करणार? विश्वास ठेवायचा असेल तर ठेव. खरोखरच तू माझी आहेस. माझ्या हृदयात तू आहेस.” त्या वेळेस उदयचे तोंड किती उदास, दु:खी व खिन्न होते ! मी त्याला म्हटले, “उदय, गेली अभ्रे, गेले संशय. आता  हस.” तर म्हणाला, “तुझी अभ्रे, तुझे संशय चटकन जातात. पटकन हसतेस, मला नाही तसे जमत. मी उगीच काल्पनिक संशय कधी घेत नाही. होता होईतो रागावत नाही. परंतु माझा राग एकदम जातही नाही. मला हुकमी हसू येत नाही. ते आतून यावे लागते.” उदयचे कसे बोलणे ! तो फार दाखवीत नसला तरी किती त्याचे माझ्यावर प्रेम ! त्याच्या एका कटाक्षात प्रेमाचे सागर असत. माझ्या अनंत अश्रूंत व बोलण्यात त्याच्या प्रेमाच्या निम्मेही नसेल. उदयचे प्रेम मुके होते. वाचाळ नव्हते. म्हणूनच ते असीम होते. उदय, ते तुझे प्रेम माझ्याजवळ आहे. तुझा देह आज कोठेही असो, तुझा प्रेमस्वरूप आत्मा माझ्याजवळ आहे.


 

पुढे जाण्यासाठी .......