शुक्रवार, जुन 05, 2020
   
Text Size

कुंटणखाना

आठ वाजून गेले होते. ती दुष्ट बाई तिच्याकडे आली. सरला डोळे मिटून बसली होती. तिच्या डोळयांतून अश्रू घळघळत होते. ती दुष्ट बाई बघत होती.

“दिवसा देवाचा जप कर. रात्री मौज-गंमत कर. म्हणजे पाप लागणार नाही. स्वर्गातील अप्सरांना कधी पाप लागत नसते. उघडा की डोळे ! का दिवसा मिटून रात्री उघडणार? परत दिवसाही रस्त्यावरच्या खिडकीतून बिजलीचे दर्शन घ्यावे लागते. अहो सरलाताई ! काय म्हणू तुम्हांला? रत्नी म्हणू की माणकी म्हणू? का गुलाबकळी म्हणू?”

सरलेने डोळे उघडले.

“तुम्ही नका मला छळू. माझी कीव करा. मला जाऊ दे. का आगीत घालता? मला विष द्या. तेही मला गोड आहे.”

“देवाने दिलेले शरीर त्याची इच्छा असेल तेव्हा तो नेईल. त्याच्या इच्छेशिवाय आपण जगू शकत नाही. काही करू शकत नाही. देवाची इच्छा म्हणून तर तुम्ही येथे येऊन पडल्यात. आता येथे सुखाने राहा, उगीच का रडत बसावे? सुखाचा जीव दु:खात का घालावा? दोन दिवस कसे तरी वाटते. पुढे होते सवय. रात्र केव्हा येते असे मग वाटू लागते. येथे कशाला तोटा नाही. फुले, अत्तरे, गजरे, शालू-शेले, दागदागिने, फळे, मेवे, काय कमी आहे? वेडेपणा सोडा. शहाण्या व्हा. आली परिस्थिती गोड करा, समजले ना?”

इतक्यात कोण तेथे आला तो? त्याचे तोंड पाहा ! विडा चघळीत आहे. मुखरस जरा गळत आहे. डोळे बघा कसे मिचकावीत आहे. कोण हा? हा नाही दिसत व्यापारी, नाही दिसत सावकार. कोण आहे हा? याला का उद्योग नाही? का याचा उद्योग संपला आहे? कपाळी भस्म आहे. भस्मावर गंध आहे? कोणी भटजी आहे की काय? तो मुखाने का नामस्मरण करीत आहे. काय म्हणत आहे? वेदमंत्र की अभंग? छे: ! प्रेमाचे पागल गाणे तो म्हणत आहे. खरेच का तो पागल आहे?

“या रामभटजी.”

“नवीन आल्या या वाटते?”

“हो. यांचे नाव सरलाबाई !”

“अगदीच साधे नाव. यांचे नाव सुंदराबाई ठेवा.”

“चांगले सुचविलेत. खरेच किती सुंदर आहे यांचा बांधा.”

“पाहात राहावेसे वाटते. मी रामाची रोज पूजा करतो. परंतु रामापेक्षा या अशा कोमलांगीच सुंदर दिसतात. मी रामाच्या मूर्तीवर फुलांचे हार घालतो; परंतु ते हार अशा लावण्यमयींच्या गळयात किती खुलून दिसतील ! रामाची मूर्ती निर्जीव. पाषाणमयी मूर्ती. परंतु या सजीव सुंदर मूर्ती ! सलज्ज सुकुमार मूर्ती !”

“रामभटजी, आता मोठमोठी गि-हाईके आणा. मोठमोठे लक्षाधीश आणा. आता खूष होऊन जातील. तुमचे कमिशनही भरपूर मिळेल.”

“करतो आता सर्वत्र जाहिरात. परंतु मला केवळ पैशांचे कमिशन नको. नुसते पैसे का चाटायचे?”

 

पुढे जाण्यासाठी .......