सोमवार, जानेवारी 25, 2021
   
Text Size

आजोबा नातू

आपण पुष्कळ वेळा एकटे असलो म्हणजे काही तरी उगीच लिहीत असतो. जवळ कागद असावा, एखादे जुने कार्ड असावे, पेन्सिल असावी, दौतटाक असावा आणि आपण तेथे काही तरी लिहितो. पुष्कळदा आपण आपलेच नाव तेथे पुन:पुन्हा लिहीत असतो, आपलाच पत्ता लिहीत असतो. जणू आपल्याशिवाय कोणी नाही ! आपण कोणाला स्मरतो, कोणावर प्रेम करतो ते अशा बारीकशा गोष्टीवरूनही दिसून येते. जो केवळ स्वत:चेच नाव लिहीत बसेल, त्याचे फक्त स्वत:वरच जणू प्रेम असेल, सर्वांत अधिक प्रेम त्याचे स्वत:वर असेल. अशा साध्या प्रसंगी आपले मन सहजपणे प्रकट होत असते. कधी कधी आपण आपले नाव आधी लिहितो. मग शेजारी आपल्या मित्राचे वा भावाबहिणीचे लिहितो. हळूहळू आपली सारी प्रिय मंडळी तेथे येऊन उभी राहतात. गंमत असते. म्हणून आपण त्या साध्या नामलेखनातही अर्थ पाहतो. आपण कधी मित्राकडे गेलो व त्याच्या टेबलावर असे खरडलेले चिटोरे सापडले तर त्यात आपले नाव लिहिलेले आहे का, ते आपण पाहतो. त्या अहेतुक नामलेखनात आपले नाव दिसले तर आपणास आनंद होतो. दिसले नाही तर आपण खट्टू होतो. कधी आपण तुरुंगात असलो तर तेथील भिंतीवर आपण प्रिय मित्रांची नावे लिहितो. किती हळुवारपणाने ती लिहितो ! आणि त्या नावांकडे पाहात राहतो. आणि कोणी पाहिले तर लाजतो. हृदयातील प्रेम कधी, कुठे, कशा स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही.

विश्वासराव ! वाचा तो एक शब्द ! ज्या उदयवर तुम्ही आग पाखडलीत, ज्याला शिव्या दिल्यात, त्याचेच ते नाव. सरला त्या नावाचा जप करी. त्या शब्दातली जादू आज तुम्हांला कळेल. त्या शब्दाची तुम्ही आपल्या अश्रुपुष्पांनी आज पूजा करा.

विश्वासरावांनी त्या वह्या, ती पुस्तके नीट ठेवली. ती त्यांनी झटकली, त्यांच्यावरची धूळ त्यांनी पुसली. त्या खोलीत ते फिरू लागले. येरझारा करू लागले. तिकडे बाळ रडत होता. त्यांचे लक्ष नव्हते. रमाबाई बाळाला घेऊन वर आल्या.

“जरा घ्या तरी याला. रडतो आहे. तुम्हाला ऐकू नाही का येत? घ्या.”

“आण इकडे.”

“त्या खोलीत नको. इकडे या. सरलेच्या खोलीत नाही त्याला घ्यायचा.”

विश्वासरावांना वाईट वाटले. परंतु तो द्वेष त्यांनीच नाही का पत्नीलाही शिकविला? ते खोलीबाहेर आले. त्यांनी बाळाला घेतले. ते त्याला खेळवू लागले. रमाबाई खाली गेल्या. स्वयंपाकपाणी करू लागल्या.

असे दिवस जात होते. परंतु एक दिवस बाळाला बरे वाटत नव्हते. तो सारखी किरकिर करीत होता. तसे पडसे नव्हते, ताप नव्हता. परंतु तोंड सुकून गेल्यासारखे दिसत होते. तो रडत होता. आंदुळले तरी राहीना, पायावर घेऊन डोलावले तरी राहीना. काय झाले त्याला? कोणाची दृष्ट पडली? पोट का दुखते त्याचे? लहान मूल. नाही सांगता येत, बोलता येत. रमाबाईंनी त्याचे पोट शेकले. तेल चोळले. परंतु बाळ राहून राहून रडू लागे.

आता सायंकाळ झाली. रमाबाईंनी मीठमोहर्‍या काढल्या. विश्वासरावांनी रामरक्षा म्हणून त्याला अंगारा लावला. परंतु बाळ रडतच होता. रडून रडून त्याचा घसा बसला. परंतु रडणे थांबेना.

 

पुढे जाण्यासाठी .......