बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

*समारोप

“मावशी ! मावशी !”

“सारे बोलतो हो नलू.”

सायंभोजने झाली. सायंप्रार्थना झाली. आणि सरला, उदय, नलू तिघे बोलत बसली होती. प्रकाश बोलत होता. खेळत होता. शेवटी तो आईच्या जवळ तेथे निजला. सरलेने नलूला सारी वार्ता सांगितली. उदय सद्गदित होऊन म्हणाला,

“नलू, माझी सरला अशा दिव्यातून गेली !”

“उदय, तुझ्यावर मी एक गोष्ट लिहिणार होते.”

“आता ही मोठी गोष्ट लिही. त्या वेळेस माझी स्मृती गेली. एवढेच तुला माहीत होते.”

“होय उदय, आता मोठी गोष्ट लिहीन. तुझ्या डोळयांचे गोष्टीत वर्णन करीन. रागावू नको हो, तेवढा मला हक्क आहे. आहे ना सरले?”

“होय नलू.”

“का रे उदय, गोष्टीला नाव काय ठेवू?”

“आधी लिहून तर काढ.”

“सरले, तू सांग ग.”

“नलू, “रामाचा शेला” असे गोष्टीला नाव दे. कारण सारी या शेल्याची कृपा ! प्रभूची कृपा ! हा शेला न येता तर उदय आपली काय रे गत झाली असती? नलू, “रामाचा शेला” हेच नाव ठेव. ठरले हो.”

 

पुढे जाण्यासाठी .......