गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

बहिण-भाऊ

“दूरच्या देशींचा                 शीतळ वाराहीं आला
सुखी मी आईकीला                        भाईराया ॥
दूरच्या देशींचा                   सुगंधी येतो वात
असेल सुखांत                               भाईराया ॥”

वार्‍याच्या गुणगुणण्यात तिला सारी कुशल वार्ता मिळते, दुसरे कोठले पत्र, कोठला निरोप ?

भाऊ खुशाल आहे. मग का येत नाही ? तिला नाना शंका येतात. लहानपणी मी चावा घेतला, दादाने भातुकलीचे दाणे खाल्ले म्हणून मी त्याला बोलले, ते आठवून का दादा येत नसेल ? परंतु ती म्हणते :

“अपराध पोटीं                  प्रेम थोरांचें घालित
येई धांवत धांवत                        भाईराया ॥”

भाऊ बहिणीवर रागावेल ही कल्पनाच तिला असह्य होते. कस्तुरीचा सुगंध कधी सरत नाही, चंद्र कधी प्रखर होत नाही, सोने सडत नाही, आकाशाचा रंग बदलत नाही. किती सहृदय उपमा व दृष्टान्त :

पाठच्या बहिणीवरी          भाऊ का संतापेल
कस्तुरी का सोडील                 निज वास ॥
पाठच्या बहिणीवरी         भाऊ कसा रागावेल
चंद्र आग का ओकेल                कांहीं केल्या ॥
पाठच्या बहिणीवरी         भाऊ कसा हो रुसेल
कधीं सोनें का कुजेल               कांहीं केल्या ॥
पाठच्या बहिणीवरी         भाऊ का रागावेल
रंग ना बदलेल                      आकाशाचा ॥

भाऊ माझ्यावर रागावणे अशक्य, मग माझ्या पतीवर का रागावला आहे ? मागे आला होता एकदा न्यावयाला, तर यांनी पाठवले नाही मला. पुन्हा कशाला येईल दादा अपमान करून घ्यायला ? परंतु बहिणीच्या समाधानासाठी दादा का ते विसरणार नाही?

 

पुढे जाण्यासाठी .......