गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

ऐतिहासिक व देशाच्या

रसपरिचय

स्त्रिया त्या त्या काळच्या घडामोंडींवरील ओव्या करतात. त्या घरातच गुरफटलेल्या असल्या तरी त्यांच्या कानांवर अनेक गोष्टी येतात. श्री शिवाजी महाराजाच्या या स्वराज्यस्थापनेच्या काळात अशा हजारो ओव्या मायाबहिणींवर रचिल्या असतील, झोपाळ्यांवर म्हटल्या असतील. परंतु मला ओव्या गोळा करण्यास वेळ मिळाला नाही. या प्रकरणात फारच थोडया पूर्वीच्या काळावर आहेत. शिवाजी महाराज म्हटले की, त्यांचे प्रतापगड, सिंहगड, रायगड हे किल्ले डोळ्यांपुढे उभे राहतात. शिवाजीमहाराजांचा पुत्र राजाराम सोन्याच्या पाळण्यात आंदुळला जात आहे अशी एक गोड ओवी मिळाली आहे:

रायगडाच्या किल्ल्यावरी     सोन्याचा पाळणी
शिवाजीचा बाळ तान्हा             राजाराम

श्री शिवछत्रपती हे शंकराचे अवतार मानले जातात. जो गोरगरिबांत येतो, त्यांच्यासाठी धडपडतो, तो देवाचा अवतार. शिवाजीमहाराजांना अवतार नाही म्हणायचे तर कोणाला ?

शिवाजी छत्रपति         सांबाचा अवतार
मावळे वानर                 रामरायाचे

आणि ही सुंदर मार्मिक ओवी ऐका:

वानरांकरवी             राम रावणा लोळवी
मावळ्यांच्या हातीं             शत्रु शिवाजी बुडवी

शिवछत्रपती दिल्लीहून कसे निसटून आले ती गोष्ट स्त्रियांच्या कानावर गेली आहे. ती मोठीच ऐतिहासिक घटना होती. ती गोष्ट क्षणात महाराष्ट्रभर पसरली असेल व शिवाजीमहाराज येथे थांबले होते, तेथे उतरले होते अशा दंतकथा गावोगाव उत्पन्न झाल्या असतील:

खाऊच्या निमित्तें         बादशहा फसविलें
शिवाजी बसून आले             पेटार्‍यांत
शिवाजीमहाराजांचे         धन्य ग धाडस
भवानी आईचे                 तो ग लाडगे पाडस

भवानी-माता शिवाजीमहाराजांना सांभाळीत होती. जनतेसाठी धाडस करणार्‍याला देव आशीर्वाद देतो. अशा धाडसाला समर्थांनी “श्रेष्ठ धारिष्ट” असे म्हटले आहे. शिवाजीमहाराज भवानी-मातेचे लेकरू असे या ओवीत म्हटले आहे. ते वाचून हृदय सद्‍गदित होते.

आणि आता शिवछत्रपतीच्या किल्ल्याचे महत्त्व ऐका:

शिवाजीचे किल्ले         किल्ले ना, ती तो किल्ली
ज्याच्या हाती तो जिंकी         दिल्ली उत्तरेची

शिवाजीमहाराजांचा महिमा ऐका:

शिव छत्रपति             धन्य ग धन्य राजा
पोटच्या पुत्रापरी             पाळिली त्याने प्रजा
दळितां कांडीता             तान्हेबाळ आंदुळीतां
शिवाजी मराठा                 आठवावा

मराठ्यांच्या इतिहासात पहिले बाजीराव व चिमाजीअप्पा म्हणजे राम-लक्ष्मणांची, भीमार्जुनांची जोडी! त्यांचे परस्परांवर किती प्रेम! चिमाजीअप्पा आपल्या पत्रांतून बाजीरावांचा उल्लेख “राया” अशा गोड शब्दांनी करतात. आणि वसईच्या संग्रामाचा तो वीररसपूर्ण अमर प्रसंग :

चिमणाजी बाजीराव         हे दोघे सख्खे भाऊ
म्हणती वसई घेऊं             एका रात्रीं

 

पुढे जाण्यासाठी .......