गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

व्रते, सण वगैरे

रसपरिचय

लग्न झाल्यावर मंगळागौर पूजायची. पहिली पाच वर्षे ही पूजा असते, श्रावणातला मंगळवार; त्या दिवशी ही पूजा करायची. पाऊस पडत असतो. पावसात नाना प्रकारची फुले फुलतात. मंगळागौरीसाठी भरपूर फुले जमविण्याची कोण खटपट, पहाटेपासून मुली उठतात. त्या आपल्या लहान भावांनाही बरोबर घेतात. पाटी-पाटी फुले गोळा होतात. आणि ती नाना झाडांची पत्री हवी. मोठी गंमत असते.

पहांटेच्या उठूं             फुले आणूं पाटीभर
आज आहे मंगळागौर             उषाताईंची

मंगळागौरीच्या दिवशी रात्रभर जागरण करायचे, खेळ खेळायचे, फुगड्या झिम्मे खेळायचे. लहानमोठया सार्‍या बायका मिसळतात, तो महोत्सव असतो. एक मैत्रीण विचारते:

कां ग सखी तुझे         डोळे असे लाल
मंगळागौरीचें ग काल             जागरण

फुगड्यांची मनोहर वर्णने आहेत. मैत्रिणी सासरहून माहेरी वा माहेराहून सासरी येतात. त्या भेटतात. आपण फुगडी खेळू, प्रेमाने गरगर फिरू, म्हणजे जन्मभर ओळख राहील असे त्या म्हणतात. लहानपणी ज्यांच्याबरोबर आपण हसलो-खेळलो त्यांची आठवण आयुष्यात चिरंजीव होते :

फुगडी खेळूं ये             तूं ग मी ग सखी
राहील ओळखी                 जन्मवेरी

फुगड्यांनी बाप्पाजींचे घर दणाणते. जोराने दणदण फुगडी चालते. पाठीमागचा खोपा सुटतो व वेणी मोकळी होते:

दणदण फुगडी             दणाणतो सोपा
खेळतां सुटे खोपा             मैत्रिणीचा

किती यथार्थ व सुंदर आहे हे वर्णन नाही ? आणि तरुण नवोढांमध्ये पोक्त सुवासिनीही मिसळतात. त्या पोक्त सुवासिनींनाही जुन्या प्रेमळ प्रसंगांची आठवण येते. त्यांनीही पूर्वी लाजत ओखाणे घेतले असतील. आज पुन्हा त्या ओखाण्यांतून पतीचे नाव घेतात :

मोठ्या मोठ्या नारी         ओखाणे प्रेमे घेती
पतीच्या नांवी प्रीती             बायकांना

चातुर्मास्यांत नाना व्रते, नाना नेम. कोणी गोपद्मे काढतात, कोणी लक्ष वाती लावतात, कोणी फुलांची, दूर्वांची लाखोली वाहतात :

वेंचायला लाग             सखी दुरवा ग मातें
लक्ष मी वाहतें                 गणेराया

आणी एकीचे शाकाहारव्रत असते. ती जाते आपल्या मैत्रिणीकडे. मैत्रीण प्रेमाने नाना प्रकारचें फराळाचे देऊ लागते. परंतु ही म्हणते :

शाकाहारव्रत             असे माझें बाई
नको देऊं भलते कांही             फराळाला

आणि चातुर्मास्यातील ते निरनिराळे दिवस : ज्या दिवशी आजीबाई कहाण्या सांगते. हातात तांदूळ घेऊन सारे लहानथोर त्या कहाण्या ऐकतात :

ऐकावी कहाणी             हाती घ्या तांदूळ
होईल मंगळ                 ऐकणारांचे

 

पुढे जाण्यासाठी .......