मंगळवार, ऑक्टोबंर 22, 2019
   
Text Size

सर्वांना नम्र प्रार्थना

नागरिक स्वातंत्र्य अबाधित राहिलेच पाहिजे, यासंबंधी माझ्या मनात विचार खेळत असतात. अनेकांच्या मनात येत असतील. स्वातंत्र्या-नंतर काहीतरी महत्त्वाचे आर्थिक फेरफार होतील, अशी आशा मला होती. पण ती आशा वेडी ठरली. जनतेत आपण आपला कार्यक्रम फैलावला पाहिजे. प्रचार करत राहिले पाहिजे. प्रचार करता करताही शेतकरी, कामगार यांच्या अनेक दु:खाची दाद लावण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे मला एक वाटते की, एकदा परसत्ता गेल्यावर या देशात लोकशाही मार्गाने जाण्याचे सार्वभौम बंधन सर्वांनी मान्य केले पाहिजे.

१) हे राष्ट्र उरलेले तरी अखंड असू दे.
२) हे राष्ट्र जातिधर्मनिरपेक्ष असू दे.
३) प्रचार लोकशाहीची, अहिंसेची बंधने पत्करून केला.              
ही तीन बंधने स्वीकारूनच सर्वांनी जावे.

हे राष्ट्र हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, पारशी सर्वांचे आहे. सर्व धर्मांना हे नांदवील. शेंकडों वर्षे अनेक धर्म येथे नांदत आले. भारतवर्ष ती थोर परंपरा चालवील. ही दृष्टी आपण सर्वांनी घ्यायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोध करायचा तो अहिंसक असावा. विरोधी लोकांना, विरोधी पक्षांना ठोकून काढायचे ही वृत्ती नको. सरकारला हिंसक विरोध करु नये, परंतु ही बंधने देशातील कोण प्रामाणिकपणे पाळायला तयार आहे.

संप, सत्याग्रह यांना अहिंसेत स्थान आहे. हे शेवटचे मार्ग असले, अखेरचे उपाय असले तरी अहिंसेत त्यांचा समावेश होऊ शकतो.

देशात पक्ष आहेत. त्यांनी आपली भूमिका निर्विवाद मांडावी. प्रामाणिकपणे मांडावी. या देशात थोडातरी प्रामाणिकपणा असो. येताजाता गनिमी काव्याची जरूरी नाही. त्याने राष्ट्र अध:पतित होते. स्वराज्यात आपल्याला ध्येयानुसार, कल्पनेनुसार अनेक पक्ष निघतील. परंतु जे आज आपले राष्ट्र आहे ते अखंड असावे, तेथे लोकशाही असावी, हे राष्ट्र सर्वांचे असावे, अहिंसक रीतीने सर्वांनी जावे, अशी बंधने सर्वांनी घालून घेतली पाहिजेत असे वाटते.

 

पुढे जाण्यासाठी .......