रविवार, एप्रिल 21, 2019
   
Text Size

सर्वांना नम्र प्रार्थना

कम्युनिस्टांचे दहशतवादी धोरण असते. ते जातात तेथे दहशत निर्माण करतात. सरकारजवळ अहिंसक सेना असती तर गोळीबार होता ना. जनता धान्य नेऊ देत नव्हती तर त्या दिवशी कार्यक्रम थांबवता आला असता. आमदारांना, मंत्र्यांना तेथे बोलावून जनतेची समजूत घालून धान्य मागून हलवता आले असते. परंतु नोकरशाही ती जुनीच अभिमानी नि अहंकारी. अधिकारप्रिय नि अविवेकी. काही कार्यकर्ते म्हणाले, 'ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढयात छळले त्यांचीच आज चलती आहे आणि लढणारे दारिद्रयात खितपत पडले आहेत !' प्राण ही पवित्र वस्तू आहे. गोळीबार करणे ही मामुली गोष्ट नाही.

हे सर्व लिहित असतांना अपार दु:ख होते. देशात गरिबांचे राज्य यावे ही गोष्ट खरी. ज्याला जमीन नाही त्याला जमीन मिळू दे. मोठे कारखाने राष्ट्राचे करा. काळेबाजार बंद करा. कंट्रोल भावाने सारे मिळेल असे करा.

सरकारला हात जोडून सांगणे ही तुमच्याशी आर्थिक बाबतीत मतभेद असले तरी जे लोक विधायक कामात भाग घेत आहेत तेही राष्ट्रसेवकच माना.

हे सारे लिहायचा एका अर्थी मला अधिकार नाही. मी कोण, कुठला ? तरीही रहावेना म्हणून हृदय ओतले आहे. सर्व पक्षांत माझे मित्र आहेत. सर्वांचे स्मरण मला होते. सर्वांच्या मंगलासाठी मी मनात प्रार्थना करतो. कर्तव्य कठोर असते. तेही सारे मित्र कठोर कर्तव्य म्हणूनच आपापल्या आजच्या धोरणांनी जात असतील. ठीक, महाराष्ट्रातील तरुणांनी तरी आणखी गंभीर विचार करून मग आपली श्रध्दा निर्धारावी.

सर्वांना नम्र प्रार्थना की, या देशात तरी इतरांपेक्षा निराळया मार्गाने सामाजिक, आर्थिक क्रांती येवो. दहशतवाद नको. लोकशाही मार्गाने चला. भारताचा जो भाग राहिला आहे त्याचे आणखी तुकडे पाडून तेथे निराळी राज्ये स्थापायची नीती नको. निर्मळ साधनांनी, लोकशाही मार्गाने, संयम पाळून या प्राचीन पुण्यभूमीत वैयक्तिक स्वातंत्र्यासही योग्य तो वाव देणारा लोकशाही समाजवाद आपण आणू या. सर्वांचा संसार सुखाचा करायचा हा एक मार्ग आहे असे जगाला सांगू या. बुध्दांच्या, महात्माजींच्या, संतांच्या, अद्वैताच्या या भूमीत तरी निराळया शिवतम मार्गाने आपण गेलो तर किती सुंदर होईल ! प्रभू करो नि भारताला तरी मंगलमय मार्गाने नेवो.

साधना : एप्रिल ९, १९४९

 

पुढे जाण्यासाठी .......