गुरुवार, जानेवारी 28, 2021
   
Text Size

या राष्ट्राचे कसे व्हायचे?

भारतवर्ष जगाला मार्गदर्शन करील, भारताकडे जगाचे डोळे आहेत, इत्यादी आत्मगौरवपर वक्तव्ये नि मंतव्ये आम्ही करीत असतो; परंतु वस्तुस्थिती पाहिली तर जगातील कदाचित सर्वांहून हतपतित असे राष्ट्र आपण असू असे वाटते. ही भारतभूमी एकेकाळी सत्यासाठी विश्वविख्यात होती. स्वप्नातील शब्द पाळणारे, सत्यासाठी बारा बारा वर्षे वनवास भोगणारे सत्वशील राजे येथे झाले. येथे दिलेल्या शब्दाचे केवढे महत्व !  भीष्म, शीबी, श्रियाळ, कर्ण केवढाली नावे !  प्रतिज्ञा-पालनाचा केवढा  महिमा !  येथे आलेल्या प्रवासी लेखकांनी लिहून ठेवले आहे की, 'हिंदुस्थानात दाराला कडीकुलूप लावण्याची जरूरी पडत नाही. पराकाष्ठेचा प्रामाणिकपणा येथे आहे. सत्याची येथे नितांत कदर आहे !'

असा हा हिंदुस्थान !  सत्य-अहिंसेला पुन्हा जगात सिंहासनावर स्थापू पाहणारे महात्माजी येथे झाले; परंतु त्या महापुरुषाला हिंदी जनतेच्या हृदयावर सत्य नि अहिंसा यांचा खोल ठसा उमटवता आला नाही असेच म्हणावे लागते! अहिंसेतूनही गांधीजी सत्याला महत्व देत. ते एकदा म्हणाले होते, 'खून करून रक्ताने माखलेल्या हातांनी कोणी मजकडे आला; परंतु त्याने प्रामाणिकपणे सारे कबूल केले तर त्यालाही मी जवळ करीन;  परंतु असत्य बोलणा-याला मी सहन करू शकरणार नाही.'  सत्य म्हणजे जीवनाची प्रतिमा. उपनिषदांत सत्याचा अपार महिमा आहे. सत्य परमात्मा. धर्मराजाचा रथ चार बोटे उंच चालावयाचा. परंतु 'नरो वा कुंजरो वा' करताच तो एकदम खाली आला!

परंतु सत्यपूजेसाठी प्रसिध्द असलेली ही प्राचीन पूण्यभूमी आज सत्याची सर्वस्वी पारखी झालेली आहे. वरपासून खालपर्यंत सारे राष्ट्र पोखरल्यागत झाले आहे. आमच्या देशातून ज्या ज्या देशांत माल जातो ते ते देश माल चांगला नसतो, आत घाण असते, तुमच्या कंपन्या फसवतात, अशा तक्रारी पाठवतात. 'भारताचा नैतिक वारसा' म्हणून तुम्ही आम्ही, लहानमोठे सारेच गौरवाने बोलत असतो. परंतु कोठे आहे तो नैतिक वारसा?  कोठे आहे ती भारतीची आध्यात्मिक संपत्ती?  कोठे आहे ते गुणांचे अपार वैभव?

भारतीची ती खरी संपत्ती होती. सुवर्णाला सुवर्णभूमीत आम्ही मान दिला नाही. राजेमहाराजे मोठ मोठी राज्ये साम्राज्ये तृणवत फेकून गंगातीरी तपस्या करायला जात. मोठमोठे सम्राट लंगोटया शुक्रा-चार्याच्या चरणांवर आपली मुकुटमंडीत मस्तके ठेवत. या देशात सत्याचा महिमा होता, सद्गुणांचा गौरव गायिला जाई. कोठे आहे ती भारतीय उदात्तता ?

मोठमोठे कारखानदार, मोठमोठया कंपन्या यांना या देशाचे नाव कलंकित होऊ नये म्हणून काहीच वाटत नाही का ?  ज्या देशात राम-कृष्ण झाले, बुध्दमहावीर झाले, त्या देशाचे नाव कलंकित करतांना काही वाटत नाही ?  दहा हजार वर्षाच्या भव्य परंपरेला दोन दिडक्या मिळाव्या म्हणून काळिमा फासायला आपण तयार होतो ?  परराष्ट्रांना फसवतो, स्वराष्ट्राला फसवतो?  सरकारला प्राप्तीवरचा कर प्रामाणिकपणे कोण देतो?

 

 

पुढे जाण्यासाठी .......