बुधवार, डिसेंबर 02, 2020
   
Text Size

राम-रहीम

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बरळत. महात्मा गांधी म्हणजे हिंदुधर्माला लागलेले ग्रहण, असे ते म्हणत. काँग्रेसला शिव्या देणे म्हणजे त्यांची संध्या. काँग्रेसच्या थोर सेवकाची निंदा करणे म्हणजे त्यांचा गायत्री जप.

परंतु त्यांचा मुलगा राम हा अगदी निराळा होता. महात्मा गांधींचा जयजयकार करणे म्हणजे त्याचे सुखसर्वस्व होते. त्याच्या त्या अभ्यासाच्या खोलीत महात्मा गांधी, जवाहरलाल वगैरेंची चित्रे होती. तिरंगी झेंडा लावलेला होता. कोटावर तिरंगी झेंडयाचे छोटे बटण लावल्याशिवाय तो शाळेत जात नसे. हृदयात तिरंगी झेंडा व छातीवर तिरंगी झेंडा. थोर काँग्रेस-सेवकांच्या गोष्टी ऐकण्यात तो तहानभूक सारे विसरी. महात्माजींचे चरित्र, काँग्रेसचा इतिहास, जवाहरलालांचे चरित्र, वगैरे पुस्तके तो पुन: पुन्हा वाची, काँग्रेसचा इतिहास वाचून त्याला वाटे, पुन्हा सत्याग्रह केव्हा सुरू होईल व आपण केव्हा जाऊ. जवाहरलालांनी, त्यांच्या डोक्यावर लाठीमार घेतला, असा आपण केव्हा घेऊ शकू, आपण भिणार तर नाही ना! असे विचार तो करीत बसे. तो आपल्या डोक्यावर कधी लाठी मारून घेई. तरी जोराने मारून घेण्यास धीर होत नसे.

परंतु मुलांचे हे काँग्रेस-प्रेम पित्याला पापमय वाटू लागले. वेळीच आळा घातला पाहिजे, असे त्याने ठरविले. एक दिवशी राम शाळेत गेला. शंकररावांनी त्याच्या खोलीतील चित्रे फाडून टाकली. तिरंगी झेंडा फाडून फेकून दिला. तेथे एक भगवा झेंडा लावून ठेवला.

राम शाळेतून घरी आला तो हा प्रकार! तो खोलीत खिन्न होऊन बसला. त्या खोलीत त्याला शून्य वाटू लागले. इतक्यात पिता तेथे आला. त्यांचा संवाद झाला.

राम : बाबा, काय केलेत हे? तिरंगी झेंडा कोठे आहे? चित्रे कोठे आहेत?

बाप : तिरंगी झेंडा चुलीत गेला. चित्रे कच-याच्या पेटीत टाकली.

राम : बाबा, येथ तुम्ही भगवा झेंडा लावला आहे. त्याचा मी अपमान करणार नाही. त्याला प्रणाम करीन. विशिष्ट धर्माची म्हणून ती खूण आहे. परंतु तिरंगी झेंडा त्याहून विशाल आहे. ४० कोटी जनता तो आपल्याखाली घेऊ इच्छितो. भगवा झेंडा १७ व्या शतकात ध्येय म्हणून शोभला. आज ध्येय वाढले आहे. आज तिरंगी झेंडा पूजिला पाहिजे.

बाप : तिरंगी झेंडा हिंदूंचा अपमान करतो.

 

पुढे जाण्यासाठी .......