बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

योग्य इलाज

गोल्डस्मिथ हा इंग्रजी भाषेतील नामांकित कवी अठराव्या शतकात झाला. 'विकार ऑफ वेफफील्ड' ही त्याची कादंबरी व 'ट्रॅव्हलर ऍण्ड डेझटेंड् व्हिलेज' या त्याच्या कविता जगप्रसिध्द आहेत. गोल्डस्मिथ हा कवी होता. त्याबरोबरच त्याला वैद्यविद्या पण थोडीफार अवगत होती. तो उदार म्हणूनही प्रसिध्द होता. एखाद्या जवळून घरखर्चासाठी कर्जाऊ पैसे तो आणी, पण वाटेत कोणी भिकारी भेटल्यास त्यास ते देऊन टाकी.

एकदा एका गरीब बाईचा नवरा आजारी पडला. तेव्हा ती बाई गोल्डस्मिथकडे आली व म्हणाली, ''महाराज, कृपा करून घरधन्यांची प्रकृती पाहाल व औषध द्याल तर गरिबावर फार उपकार होती.''

गोल्डस्मिथ लगेच त्या बाईकडे गेला. त्याने त्या बाईच्या नव-याची प्रकृती वगैरे तपासून पाहिली. परंतु त्यास रोग आढळला. तो एवढाच की पुरेसे अन्न वगैरे त्यास मिळत नाही.

गोल्डस्मिथ त्या बाईस म्हणाला, ''माझ्याबरोबर तुमचा मुलगा पाठवा. मी त्याच्या हाती औषध पाठवून देतो.''

गोल्डस्मिथ घरी गेला. त्या मुलाबरोबर दहा सोन्याची नाणी पिशवीत घालून त्याने पाठवून दिली.

पिशवीतील औषध पाहून तो गरीब मनुष्य चकित झाला. आपला रोग दारिद्रयाचा होता हे गोल्डस्मिथने ओळखले, असे त्याला पक्के समजले. त्याने त्याला मनात धन्यवाद दिले.

तो मनुष्य नीट बरा झाला. बरा झाल्यावर गोल्डस्मिथकडे जाऊन तो म्हणाला, ''महाराज, मी आपला कायमचा ऋणी आहे. तुम्ही मला वाचविलेत, नाही तर माझ्या चार कच्च्याबच्च्यांचा सांभाळ माझी एकटी बायको कशी करती ?''

गोल्डस्मिथ म्हणाला, ''बाबारे, प्रत्येकाने दुस-यास शक्य ते साहाय्य करावे हे कर्तव्य आहे. मी मोठेसे काय केले ?''