बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

बाळपणचा मित्र

मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ  आवाज, त्याच्या पंखांचे फडफडणे, त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी वेळा पाहावयाचा. लहाणपणी, विशेषत: मला, जेवताना आई अंगणात घेऊन यायची. तिच्या हातात घास असायचा व भरवताना ती मला म्हणायची, “हा घे हां, हा काऊचा, हा चिऊचा, तो बघ काऊ. येरे येरे काऊ, माझा बाळ घास खाऊ.” आणि मग घास घ्यायचा. मी राजा. आईच्या कडेवर बसून असा एक एक घास मी खेळत खेळत, चिमण्या-कावळे बघत बघत घ्यायचा. मध्येच कावळा उडून जाई. “गेला काऊ. घे रे एवढा घास, घे हो.” असे आई म्हणायची.  आजूबाजूस कावळा दिसल्याशिवाय मी जेवायचा नाही. मी जरा मोठा झाल्यावर त्याला भाकरी फेकायचा व तो धिटुकला ती घ्यायचा. एक दिवस तर मी अंगणात भाकर घेऊन बसलो होतो, तो आपला आला आणि माझ्या हातातून घेऊन गेला भाकर! मी टाळ्या वाजवल्या. मला गंमतच वाटली. “आई, काऊ आला व त्याने माझी भाकर नेलीन्. त्याला त्याची आई नाही का ग देत? त्याला माझी आवडते, माझ्या आईच्या हातची आवडते, होय?” असे मी आईला विचारायचा व पुन्हा अंगणात जाऊन “काव – काव – काव,  माझा तुकडा लाव” असे म्हणायचा. परंतु तो उंच झाडावर बसे. मला वाटे, कावळा माझ्याजवळ येतो; मला का बरे नाही त्याच्याजवळ जाता येत. मी आईला विचारायचा, “आई, माझे ग कोठे आहेत पंख? माझे पंख कोणी तोडले? कावळ्याला उडता येते, आपल्याला का नाही ग येत?” आई हसे व म्हणे. “देवाला राग आला व त्याने आपणा माणसांचे सारे पंख कापून टाकले. नाहीतर पूर्वी माणसांना येत असे उडता. रावण नव्हता का आकाशातून उडत आला?”

“तो तर रथात बसून आला होता. त्याचा रथ जटायूने मोडला.” मी म्हणे.

“जा रे खेळायला बाहेर” म्हणून आई मला बाहेर घालवी.

काही असो, परंतु लहाणपणापासून कावळ्याबद्दल मला प्रेम वाटे, स्नेह वाटे, आपलेपणा वाटे. मी मोठा होऊ लागलो. मला वाईट वाटे कावळ्याला सारे लोक नावे ठेवतात; त्याला अमंगळ म्हणतात, लबाड, दुष्ट म्हणतात, त्याला अधाशी म्हणतात, खादाड म्हणतात. ‘सर्वभक्षकस्तु वायस:’ हा चरण रचून कोणी तरी कावळ्याची कायमची नालस्ती करुन ठेवली आहे. ज्या कोणी हा चरण लिहिला त्याला मी मनात शेकडो शिव्या दिल्या.

 

पुढे जाण्यासाठी .......