बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

माणसांप्रमाणे वागा

सारे काही मनावर आहे; मनातील शक्तीवर आहे. बाह्य जगाला आपणच शक्ती देत असतो. शक्तीचा साठा आपल्या मनात आहे. बाहेरच्या जगाने कितीही ऐट मारली तरी ती पोकळ आहे. बाह्य जग हे आपल्या मनाचे खेळणे आहे. आपल्या मनातील विचारांचेच बाह्य जग हे प्रतिबिंब आहे. भगवान् बुध्द म्हणत असत, “आपली आजची जी स्थिती आहे, ती आपल्या विचारांचे फळ आहे, आपल्या चिंतनाचा तो परिणाम आहे.” “विचार आपणांस आकार देत असतात, रंगरूप देत असतात. जीवनाची सारी इमारत मनातील विचारांवर उभारलेली असते.”

असे आहे म्हणूनच जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. आपले मन कार्य करण्यास सदैव सज्ज असले पाहिजे. जे काम करावयाचे असेल ते छोटे असो वा मोठे असो; केव्हाही मन इच्छाशक्तीच्या हुकमतीखाली राहिले पाहिजे व त्याला हाक मारताच त्या त्या कर्मात रंगले पाहिजे. कोणताही प्रश्न असो, त्यात खोल दृष्टी पोचवण्यास मन समर्थ पाहिजे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मनाला नीट देता आले पाहिजे. आपल्या देशात पूर्वी मिळत असे त्यापेक्षा नि:सत्त्व अन्न राष्ट्रास आज मिळू लागले तरीही एक वेळ चालेल, परंतु मन दुबळे होऊन मात्र चालणार नाही. पोटाची उपासमार झाली तरी होऊ दे., परंतु मनाची होता कामा नये. शरीर दुबळे झाले तरी होवो, परंतु मन खंबीर राहो. योग्य व तेजस्वी शिक्षण मिळालेच पाहिजे. मनाला भरपूर खाद्य, पोटभर भाकरी मिळालीच पाहिजे.

तुम्ही कोणता विषय शिकता, ही गोष्ट महत्त्वाची नाही. प्रश्न आहे तो मनाचा आहे. जो विषय अभ्यासिलात, त्या विषयाच्या अध्ययनाने मनाला कोणते सामर्थ्य मिळाले, किती शक्ती मिळाली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाहेरचे तंत्र, बाहेरची कवाईत काहीही असो; बौध्दिक सामर्थ्य त्यामुळे नीट पुष्ट झाले पाहिजे. दोन मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. १. ज्या विशिष्ट साधनांचा आपण उपयोग करू ती साधने. २. ज्या मानसिक शक्तीने आपण ती ती साधने, ते ते विषय पकडतो त्या मानसिक शक्तीचे शिक्षण. तरवारीचा परिचय असणे हे नि:संशय चांगले आहे; परंतु बाहूंत सामर्थ्य असणे ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही संस्कृत शिका की इंग्रजी शिका; काव्य शिका किंवा इतिहास शिका; शास्त्र शिका किंवा धंदेशिक्षण घ्या; ह्या निरनिराळ्या साधनांनी मन तयार होत असते. हे निरनिराळे खेळ खेळून मनाची शक्ती कमवायची असते. आपणांस शक्ती पाहिजे आहे. विचाराची शक्ती, एकाग्रतेची शक्ती.

ही मनाची शक्ती संपादण्यात भारतवर्षाचा हातखंडा होता. अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारची ही शक्ती भारतवर्षात प्राप्त केली जात असे. एकाग्रतेचा अभ्यास येथे जितका केला जात असे, तितका अन्यत्र क्वचितच केला जात असेल. एकाग्रतेच्या अभ्यासाने विचारशक्तीच मिळत असते. आपणास कधी काळी जर समाधीचा अनुभव आला, तर तिचाही हाच अर्थ आहे, असे कळून येईल. प्रार्थना, पूजा, जपजाप्य, पुनश्चरणे- सर्व साधनांचा हाच एक हेतू असे. मनाला ताब्यात ठेवण्याची पराकाष्ठेची निग्रहशक्ती मिळविणे हाच हेतू असे. राष्ट्रांची श्रेष्ठाश्रेष्ठता शेवटी बाह्य बळावर अवलंबून नसून ह्या मानसिक बळावरच अवलंबून असते. ज्या राष्ट्राची मानसिक शक्ती श्रेष्ठ ते राष्ट्र श्रेष्ठ होणार. त्या राष्ट्राची ती श्रेष्ठता आज सुप्त असेल, अप्रकट स्थितीत असेल; परंतु उद्या ती प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. उद्योग चालू दे, अभ्यास सुरू असू दे. यत्नदेवो भव. ढिलाई नको. शिथिलता नको. असे करीत राहिलेत म्हणजे गेलेले स्वत्व एक दिवस तुम्ही मिळवून घ्याल. वेळ काही अजून गेली नाही.

 

पुढे जाण्यासाठी .......