बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

श्रध्देचे सामर्थ्य

ज्यांच्यामध्ये राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट झाल्या आहेत, राष्ट्रांची खरीखुरी ध्येये ज्यांच्या जीवनात विकसित झाली आहेत, अशा आदर्श व्यक्ती प्रत्येक संस्कृतीत असाव्या लागतात. त्या संस्कृतीचे ध्येय काय, त्या संस्कृतीचे काय उद्दिष्ट, काय विशिष्ट स्वरूप हे अशा प्राणमय व्यक्तींच्या जीवनाने सभोवतालच्या जगास कळून येते. संस्कृतीप्रमाणे संस्थांचेही आहे. निरनिराळ्या संस्था निरनिराळ्या ध्येयांसाठी उभ्या असतात. त्या संस्थांचे कार्य, त्या संस्थांचे ध्येय, त्या संस्थेतील प्राणभूत व्यक्तीकडून प्रकट केले जाते. आर्यसमाज, ब्राह्मसमाज, रामकृष्ण मिशन अशा शेकडो संस्था असतात व त्या संस्था कशासाठी उभ्या आहेत हे त्या संस्थेसाठी सर्वस्व देणार्‍या अशा ज्या महान् विभूती असतात, त्यांच्या जीवनाच्या द्वारा कळत असते. अशा या व्यक्ती दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असतात. कोठे जावयाचे व कोठे जावयाचे नाही हे त्यांच्या जीवनावरून जगाला कळत असते. जेथील लोकांचे हृदय मेलेले नसून शाबूत आहे, जेथले लोक प्रामाणिकपणे अंत:करणपूर्वक, आस्थापूर्वक झटत आहेत, धडपडत आहेत, अशा लोकांत महापुरुष जन्माला येतात, असे कष्टाळू व श्रध्दाळू लोक महापुरुषांस खेचून आणतात. महापुरुष हे जीवनदायी मेघाप्रमाणे असतात. वने व पर्वत ज्याप्रमाणे मेघांना ओढून घेतात, त्याप्रमाणे वर डोके काढण्यासाठी धडपडणारे लोक, वर उन्नतीकडे जाण्यासाठी प्रयत्न करणारे लोक महापुरुषास आकर्षून घेतात. अमेरिकेत त्या आणीबाणीच्या वेळी अब्राहाम लिंकन जनतेला मिळाला. तो सूत्रधार बनला व राष्ट्रांची ध्येये त्याने मूर्तिमंत केली, सत्स्वप्ने कल्पनासृष्टीत आणिली. अमेरिका नेहमी त्या ध्येयांची, अब्राहम लिंकनच्या जीवनाद्वारा प्रकट झालेल्या ध्येयांची पूजा करीलच असे नाही. नानाविध पसार्‍यात व अनेक गोष्टींत गुरफटल्यामुळे त्या ध्येयांचा अमेरिकेस कदाचित् विसरही पडेल. परंतु तो विसर कायमचा पडणार नाही. काही झाले तरी, स्वातंत्र्य व समता, बंधुभाव व लोकसत्ता हीच अमेरिकेची थोर ध्येये सदैव असतील. ह्या ध्येयांवरची श्रध्दा ज्या दिवशी अमेरिका गमावील त्या दिवशी अमेरिका मेली, असे खुशाल समजावे. शुध्द परंपरेचा नंदादीप, राष्ट्र आजपर्यंत ज्या थोर ध्येयांना पूजित आले; वाढतीत आले त्या ध्येयांचा नंदादीप विझून जाणे म्हणजेच राष्ट्राचा प्राण निघून जाणे होय.

ज्याची आपल्या राष्ट्राच्या ध्येयावर, राष्ट्राच्या भवितव्यावर श्रध्दा नाही, ज्याला स्वत:ला स्वत:च्या जीवनात मोलवान असे काही दिसतच नाही, त्याला नास्तिक व निराशावादी म्हणतात. अशा माणसाला सर्वत्र अंधारच दिसतो. तो बाजूला बसून सर्व गोष्टींची व व्यक्तींची टरच उडवतो. सर्वांच्या प्रयत्नांची थट्टा करणे हाच त्याचा व्यवसाय होतो. गंभीर व पूज्य असे त्याला काहीच दिसत नाही.  सर्व भावनांना तो थोतांड समजतो, दुसर्‍यांच्या भावनांना दुखविण्यात त्याला काहीच वाटत नाही. प्रार्थना, आशावाद कशातच त्याला तथ्य दिसत नाही. जिकडे तिकडे दंभ आहे, स्वार्थ आहे, असे तो बडबडतो. कुचेष्टा करणे हा त्याचा धर्म. असा मनुष्य सामुदायिक जीवनाला राष्ट्रीय जीवनाला पोखरणारा किडाच होय. राष्ट्राचे हृदयसिंहासन हा भुंगा पोखरून व रामाला तेथे बसू देणार नाही. असा मनुष्य उघड उघड स्वार्थाची पूजा करतो व असे केल्यानेच आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, निदान मी दांभिक तरी नाही असे सांगत असतो. दुहीच्या व कलीच्या काळात, ज्या वेळेस द्रोह-मत्सरांना ऊत आलेला असतो अशा काळात असल्या नास्तिकांचे भरपूर पीक येत असते. त्यांचा सुळसुळाट होतो. ज्या वेळेस राष्ट्रात उत्साह व चैतन्य खेळत असते, थोर आशा व महनीय ध्येये मांडली जात असतात, पूजिली जात असतात, अशा वेळेस हे लोक अदृश्य होतात. सूर्य येताच घुबडे निघून जातात. अंधारातच त्यांचा भीषण घूत्कार चालावयाचा. तुमच्या मंगल राष्ट्रमंदिरात घुबडांचे अभद्र दर्शन नको असेल तर, प्रचंड सामुदायिक चळवळी ध्येयभक्तीने झाल्या पाहिजेत; उत्साहाचे पूर वाहविले पाहिजेत; श्रध्दापूर्वक कामास वाहून घेतले पाहिजे. प्रचंड वृष्टीने घाण धुऊन जाते, त्याप्रमाणे मोठमोठ्या राष्ट्रव्यापक चळवळींनी राष्ट्रातील खळमळ पार धुतला जातो. राष्ट्राचे आरोग्य नीट राहावे म्हणून अशा सफाईच्या चळवळी झाल्याच पाहिजेत. मग ह्या चळवळीचे ध्येय कोणतेही का असेना. स्वराज्य असो वा स्वराज्य असो, ध्येय ऐहिक असो वा पारमार्थिक असो, भावनांचा प्रचंड खळखळाट राष्ट्रात धो धो वाहू लागताच भावनाशून्य दगडही जरा गतिमान होतात व जाग्यावरून जरा हलतात आणि पुढे सरकतात. असे चळवळीचे जोरदार पूर न येतील तर हे सनातनी कधीही जागचे हालणार नाहीत. ते ऐदी गोळ्यासारखे पडून राहतील. मानवजातीला अजून सामुदायिक हृदय आहे. सर्व समाजाचे जणू एक मन आहे, एक हृदय आहे. समाजाची अजून शकले शकले झाली नाहीत. महापुरुष दिसताच त्याची हाक सारे ऐकतात. महान् ध्येय दाखवताच बहुजनसमाज उचंबळतो. त्या महापुरुषाच्या कार्यात भाग घ्यावयास सारे धाव घेतात. मोठ्या यंत्रातील लहान लहान भाग होणे ह्याहून महत्त्वाचे दुसरे काही नाही. महाकाव्यातील शब्द बना, भगवद्गीतेतील अक्षर बना, फुलांच्या हारातील फूल बना, फुलातील पाकळी बना, यंत्रातील चक्र बना, चक्रातील स्क्रू बना, सतारीची खुंटी बना,तार बना, सिंधूतील लाट बना, लाटेतील बिंदू बना. सूर्यमालेतील ग्रह बना. ग्रहांचे उपग्रह बना, पर्वतातील दगड बना, दगडातील अणूपरमाणू बना. मोठ्या गोष्टींत मिळून जाऊन स्वत:ही मोठे व्हा. जे ध्येय राष्ट्राने समोर ठेवले असेल, त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालावयास लागा. त्या ध्येयपुरुषाचे हृदयातील शुध्द रक्तच आपल्याही नसानसांतून उडो, उसळो. ध्येयाला अहितकारक, ध्येयाला कमीपणा आणणारे, ध्येयाला मारक, काहीही आपण करता कामा नये. ध्येयाला फुलविणारे, वाढविणारे जे जे असेल ते केल्याशिवाय राहता कामा नये.

 

पुढे जाण्यासाठी .......