बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

प्रपंच व परमार्थ

पृथ्वीवर अनेक देश आहेत, परंतु प्रत्येक देशात हे श्रेष्ठ व हे कनिष्ठ, हे उच्च व हे नीच, हे पर व हे अपर, हे पवित्र व हे अपवित्र, हे सांसारिक व हे पारमार्थिक असे भेद दिसून येतात. या पर-अपराच्या, उच्च-नीचाच्या कल्पना पार झुगारून देण्याचे धाडस जर कोणी केले असेल, तर ते फक्त हिंदुस्थानने होय. या भेदाच्या भिंती उडवून टाकण्याचे काम भारताने केले आहे. विचाराची इतकी धीरता इतरांस दाखवता आली नाही, विचाराची एवढी मोठी उडी इतर राष्ट्रांस मारता आली नाही. अद्वैत तत्त्वज्ञानाचा तलास लावून, बुड्या मारून मारून ह्या तत्वज्ञानमौक्तिकाला वर काढून आणून, त्याच्या जोरावर सर्व जीवनाचा साक्षी होऊन राहण्याचे महाभाग्य, जीवन म्हणजे खेळ आहे, लीला आहे, असे अंतरंगी समजून वागण्याचे भाग्य, मानवाला हिंदुधर्माने दिले आहे. आपल्या थोर पूर्वजांची महनीय करणी व विशाल विचारसरणी, त्यांची कृत्ये व त्यांची ध्येये यांना शोभेसे आपण वागणार नाही काय ? आपल्या पूर्वजांच्या मार्गावरून आपणच जर गेलो नाही, तर दुसर्‍यांना तरी तेथे बोलावण्यास आपणाला तोंड कोठून राहणार ?

पकडण्याच्या आधी थोडा वेळा पुढील तेजस्वी व गंभीर शब्द येशू ख्रिस्त बोलले होते. प्रभू म्हणाला, “सायमन, सायमन ! सैतान तुला निवडून काढणार आहे. सैतानची दृष्टी तुझ्याकडे वळली आहे, तुझ्या जीवनाच्या कणसातील धान्याचा दाणा, शुध्द तेजस्वी सत्त्वाचा दाणा दिसावा म्हणून सैतान तुला झोडपून पाहणार आहे.”  भावी कृत्यांच्या छाया आधीच दिसू लागतात, अशी म्हण आहे. पावसाची लक्षणे आधी दिसू लागतात. भगवान ख्रिस्त हे शब्द जणू स्वत:लाच उद्देशून बोलत होते. अवतारी पुरुषाचे सामर्थ्य अपरंपार असते. सारे जग कट करून त्याची कसोटी पाहावयास येत असते; सर्व जगाची अशी इच्छा असते की, त्या महापुरुषाने शरण यावे; आपल्या बाजूस कोणी नाही, आपण असहाय, निराधार, सर्वत्यक्त आहोत, अशी स्वत:च्या दुबळेपणाची त्या महापुरुषास जाणीव व्हावी, अशी जणू जगाची इच्छा असते. परंतु तो महान् शक्तीचा अवतार, ती दिव्य भव्य विभूती, तो महात्मा, तोही जगाची परीक्षा घ्यावयास उभा राहतो. जगातील सारेच लोक नि:सत्त्व व पोचट झाले आहेत की काय, त्यांच्यात काही तेज, काही सत्त्व, काही राम आहे की नाही, हे तो महापुरुष जाणून घेऊ इच्छितो. जगाची नाडी पाहावयास तो उभा राहतो. अखिल मानवजात विकारांनी उन्मत्त होऊन सभोवती हैदोस घालीत असता तो महात्मा ध्रुवतार्‍याप्रमाणे आपल्या ध्येयाशी निष्ठावंत राहतो. त्याची दृष्टी स्थिर असते. त्या महापुरुषाच्या पायांजवळ लाखो लाटा, कोटयावधी जीवांच्या चंचल लाटा हेलकावत असतात; परंतु पहाडाप्रमाणे तो महापुरुष अचल राहतो. समाजात दुर्बलता, चंचलता जितकी अधिक, तितकी महात्म्याची स्थिरता, ध्येयनिश्चितता व शक्ती ही अधिक दिसून येतात.

 

पुढे जाण्यासाठी .......