रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

आपले नेहरू

पहिला तुरुंगवास

त्या वेळेस राजपुत्र भारतांत यायचे होते. राष्ट्रसभेनें त्यांच्या स्वागतावर बहिष्कार घातला. मोतीलाल व जवाहरलाल यांना अटक करायला अधिकारी आले. आनंदभवनांत पोलीस घुसले. घरांतील नोकर संतापले. जवाहरलालजींच्या आईनें नोकरांना शान्त केलें. पितापुत्रांना अटक झाली. खटला सुरू झाला. सरकारी वकील मोतीलालजींचा मित्र. तो त्यांच्याकडे बघायला लाजत होता. सहा महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा देण्यांत आली. दंडासाठीं घरांतील वाटेल तें मोलवान सामान नेण्यांत आलें. सरकारनें दीड महिन्यानेंच सोडलें, परंतु जवाहरलालांना पुन्हा लगेच शिक्षा झाली. तुरुंगांत जाणें-येणें आतां नित्याचें झालें.

आजारी पडले

जवाहरलाल कधीं आजारी पडत नाहींत. ‘माझी प्रकृति पोलादी आहे’ असें ते अभिमानानें म्हणतात. ते एकदांच आजारी पडले. नाभा संस्थानांत जुलूम चालला होता. पंडितजी तिकडे जाऊन आले. परंतु त्या हवेंतून ते विषमाचा ताप घेऊन आले. ताप हटेना. सर्वांच्या तोंडचें पाणी पळालें. परंतु एके दिवशी ताप निघाला. सर्वांचा जीव भांड्यांत पडला. १९२३ मधील त्या आजारानंतर आजवर ते कधीं आजारी पडले नाहींत. तुरुंगांत असोत वा बाहेर, ते नियमित व्यायाम घेतात. मोजकें खातात.

युरोपांत हवापालट

लढ्याची पहिली लाट ओसरली होती. पहिली उसळी मंदावली होती. कमला अति उत्साही, ज्वालेप्रमाणें तेजस्वी. परंतु तिची मूळची नाजूक प्रकृति या सुमारास बरीच खालावली. जवाहरलाल त्या वेळेस आपल्याच ध्येयसृष्टींत वावरत. ते युक्तप्रान्तांतील किसानांत भटकत होते, हजारों खेड्यांतून हिंडत होते, पायीं जात होते. त्यांना कंमलेची जणूं आठवण नव्हती. पत्‍नी म्हणजे का त्यांना बंधन वाटत होतें ? कमलाहि त्यांच्यासंगें हिंडली असती, वणवण करीत. परंतु ती स्वाभिमानी होती. आपण होऊन ती काय म्हणून सांगेल ? जवाहरलालांना कमलेचें हृदय, तिच्या आकांक्षा त्या वेळेस कळल्या नाहींत.

कमलाच्या प्रकृतीसाठी जवाहर तिला व छोट्या इंदिरेला घेऊन युरोपला निघाले. पुढें छोटी बहीण कृष्णाहि तिकडे गेली. जिनीव्हा हें आंतरराष्ट्रीय भेटीगांठींचें स्थान. तेथें ही मंडळी राहिली. स्वित्झर्लंड सृष्टिसौंदर्याचें माहेरघर. जवाहर म्हणजे निसर्गाचें बाळ. पर्वतांवर चढावें, दर्‍यांतून उतरावें, विमानांतून उंच आकाशांत जावें, समुद्रांत डुंबावें, बर्फावरून घसरावें, फुलें-पांखरे बघावीं, आकाशांतील रंग बघावे, तारे निरीक्षावे, ही सारी त्यांना हौस. एकदां बर्फाच्या पर्वतावर मंडळी गेली होती. जवाहरलालांना कोणाचा धक्का लागला नि चालले खालीं घसरत. उजवीकडे प्रचंड कडा होता. मोठ्या प्रयासानें घसरतां घसरतां ते कुशीवर वळले. थोड्या वितींच्या अंतरानें खोल दरींत न पडतां दगडांशीं जाऊन अडकले. आणि भारताचा महान् पुत्र वांचला. पांचदहा सेकंदांचा तो अवधि परंतु युगाप्रमाणें वाटला. रात्रीं एका शेतकर्‍याकडे मग जेवले, झोंपले.

 

पुढे जाण्यासाठी .......

आपले नेहरू