गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

आपले नेहरू

जवाहरलाल इंग्लंडमध्यें शिकत होते, तेव्हां भारतांत वंगभंगाची चळवळ भडकली, बाँब पडूं लागले, लोकमान्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्लंडांत, युरोपांत अनेक हिंदी देशभक्त धडपडत होते. जवाहरलाल त्यांत ओढले गेले नाहींत, तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला असेलच. ते स्वदेशांत आले नि लौकरच पहिलें महायुद्ध सुरू झालें. लोकमान्य टिळक सुटले. ते पुन्हा काँग्रेसमध्यें आले. मोतीलाल काँग्रेसच्या अधिवेशनास पूर्वीपासून जात. परंतू ते नेमस्त. १९७० मध्ये लोकमान्य अलाहाबादला गेले तेव्हा कोणीहि पुढारी त्यांच्या स्वागतासाठीं स्टेशनवर गेला नाहीं. हजारो विद्यार्थी गेले, त्यात नरेंद्रदेव होते. मोतीलाल, मदनमोहन, सप्रू वगैरे नेमस्त मंडळी. टिळक सुटून आले नि होमरूलची चळवळ सुरू झाली. नरेन्द्रदेव होमरूल लीगचे सेक्रेटरी झाले. तरुण जवाहरलाल कुठें आहे ? पितापुत्रांचीं बोलणी होत होतीं का ? अजून वेळ आली नव्हती.

विवाह


देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाशीं लग्न लागण्याआधीं त्यांचें १९१६ मध्यें कमलेशीं लग्न लागलें. दिल्लीचा तो लग्नसोहळा अपूर्व होता. अलाहाबादला आनंदभवनांत आधींपासून किती दिवस तयारी ! शिंपी, जवाहिर्‍ये, सराफ, सर्वांची सारखी जा-ये. ती पहा अलाहाबादहून शृंगारलेली खास लगीनगाडी सुटली. गोतावळा, तें विराट वर्‍हाड दिल्लीला आलें. किती तरी बंगले भाड्यानें घेतले तरी अपूरे पडले. शेवटीं तंबू ठोकले. कमल नि जवाहर यांचा जोडा शोभत होता. कमला अति सुंदर होती. तिच्या तोंडावरची अल्लड कोंवळीक ती पुढें मोठी झाली तरीहि होती. संसार सुरू झाला. कशाला तोटा नव्हता. कुबेरासारखें वैभव, घरीं गजान्त लक्ष्मी, प्रेमळ मायबाप, प्रेमळ बहिणी, सुंदर पत्‍नी, विद्या, तारुण्य, सारें होतें. १९१७ सालीं एकुलती मुलगी इंदिराहि जन्मली. ‘इंदिरा प्रियदर्शिनी’ असें तिला सारे म्हणत. सुंदर आईबापांची ती सुंदर मुलगी होती. जीवन असें जात होतें. तरी अजून जीवनाला अर्थ नव्हता प्राप्त झाला. आणि क्रान्तीचा क्षण आला.

महात्माजी


१९१४ अखेर महात्माजी दक्षिण आफ्रिकेंतून मायभूमीला परत आले. तिकडे यशस्वी केलेलें सत्याग्रहाचें अमर शस्त्र घेऊन आले. आफ्रिकेंतून निघतांना अनुयायांना ते म्हणाले : “मरणाची पर्वा न करणारे कार्यकर्ते असल्याशिवाय कोठलें स्वराज्य ? आपण सत्याग्रहाचें शस्त्र घेऊन जाऊं, प्राण हातांत घेऊन जाऊं.” चंपारण्य, खेडा जिल्हा येथे हे नवे प्रयोग सुरू झाले. बनारस हिंदु युनिव्हर्सिटींतील राजेरजवाडे व इतर देशबंधु यांच्यासमोर गांधीजींनी जें जळजळीत भाषण केलें ते का जवाहरलालांच्या कानांवर गेलें नसेल ?  त्याच्यावर आनंदभवनांत का चर्चा झाल्या नसतील ? महात्माजी वाट बघत होते.

 

पुढे जाण्यासाठी .......

आपले नेहरू