सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

आस्तिक

परमेश्वर अनंत चिंतनांत तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीनें जागे केले:

भगवन् देवदेव, मला भीति वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाहीं तोच तो फसणार असे वाटते. प्रथम आशा वाटत होती. ज्यासाठी हा सुंदर भारत देश आपण निर्मिला ते ध्येय नीट रुजेल, चांगले अंकुरेल, दृढ मुळे धरील, असे वाटत होतें. मला समाधान वाटत होते. सर्व सौंदर्य ह्या देशाच्या निर्मितीत आपण ओतलें. ह्याच्या पायापासून डोक्यापर्यंत अनंतता पसरून ठेवली. डोक्याशी गगनाला भेटू पाहणारा हिमधवल नगाधिराज उभा केला व तीन्हीं बाजूंना उचंबळणारा, सर्व प्रवाहांना पोटात घेणारा, सर्व प्राणिमात्रांना आश्रय देणारा रत्नाकर पसरून ठेवला. पायांशी व हातांशी समुद्र, डोक्याशी स्थिर असा पर्वत ! हात व पाय नाना प्रकारच्या उद्योगांत श्रमूं देत, धडपडूं देत, प्रयोग करूं देत. परंतु त्या प्रयोगाचें धोरण निश्चित असू दे. डोक्यांत एकच ध्येय असू दे. डोक्यांत चंचलता नको. एकाच ध्येयाला भेटण्यासाठी सारे उद्योग असू देत.  असें ह्या भारतवासीयांना शिकविण्यासाठीं दोन महान् वस्तु आपण त्यांच्याजवळ अक्षय ठेवून दिल्या. देवा, हा देश निर्मितांना सारी कुशलता व सुंदरता आपण ओतली. सर्व प्रकारची हवा येथें खेळती ठेवली. सर्व प्रकारच्या वनस्पति येथें लावून ठेविल्या. अनंत प्रकारची फुलें व फळें यांनी या देशाला समृध्द करून ठेविले. विविध रंगांचे व विविध आकारांचे पशुपक्षी येथे निर्मिले. सकाळी व विशेषत: सायंकाळीं निळया निळया आकाशांत अनंत रंगांचे वैभव आपण दाखवितो. स्वच्छ सूर्यप्रकाश व स्वच्छ चंद्रप्रकाश ह्या भूमीला आपण दिला. धुक्याचा धूसरपणा येथें क्वचितच आपण निर्मितो. येथें ही विविधता व स्वच्छता निर्मिण्यांत देवा, आपला हेतु होता.

देवा, तूं मानवप्राणी निर्माण करून दशदिशांत पसरलास. निरनिराळया ठिकाणीं याची निरनिराळया रीतींनी वाढ झाली. त्या सर्वांना एकत्र पाहण्याची तुझी इच्छा आहे. निरनिराळया फुलांचा हार सुंदर दिसतो. त्याप्रमाणें भिन्न भिन्न देशांत भिन्न भिन्न परिस्थितींत वाढलेले मानवप्रवाह थोडेथोडे एकत्र कोठें तरी आणून त्या सर्वांचे मनोहर ऐक्य पहावें असें, हें देवदेवा ! तुझ्या मनांत होतें. तो प्रयोग ज्या ठिकाणी करावयाचा ते ठिकाण तूं अनुपम रीतीनें सजवून ठेवलेंस. भारताची विविध रंगांनी नटलेली ही भूमि तूं आपली रंगभूमि ठरविलीस.

प्रभो, रंगभूमि निर्मून 'प्रयोगाला सुरुवात करा' असे तूं सांगितलेंस. 'ज्या दिवशीं प्रयोग शेवटच्या स्थितीला येईल, त्या दिवशी मला उठवा, तें महान् दृश्य पाहावयास उठवा' असें तूं सांगून ठेवलेंस, आणि तूं अनंत चिंतनांत, अपार मननांत मग्न झालास.

परंतु, देवदेवा, प्रयोग बरा होऊं लागला. बीजाला अंकुर फुटूं लागले. कालान्तरानें ह्या बीजाचा महान् वैभवशाल वृक्ष होईल, अशीं सुखस्वप्नें मी व माझे सहकारी मनामध्यें खेळवूं लागलों. परंतु एकाएकी महान् विघ्न येत आहे. ह्या देशांत आर्य व नाग यांना एकत्र आणलें. येथील नागजातीच्या मानव-प्रवाहांत जोरदार आर्यजातीचा प्रवाह वरून आणला. प्रथम विरोध झाले. हा प्रवाह त्याला लोटीत होता, तो त्याला. प्रवाह प्रवाहांत मिळेना. परंतु त्या विरोधांतहि आशा दिसत होती. गढूळपणा खाली बसत होता. मोठमोठी माणसेभांडत होतीं, परंतु मिठयाहि मारीत होतीं, एकमेकांशी लढत होतीं, परंतु त्यांतूनच प्रेमाची नातींहि जडत होतीं. परंतु देवा, आज सारी क्षुद्रांची सृष्टि दिसत आहे. महान् विभूति अस्ताला गेल्या.

 

पुढे जाण्यासाठी .......

आस्तिक