बुधवार, जुन 26, 2019
   
Text Size

आस्तिक

एका चित्राजवळ तो उभा होता. सजल नयनांनी तें तो पाहत होता. माता उत्तरा 'सती जाते' म्हणत होती. धर्म, भीम, अर्जुन, सुभद्रा सारीं शोकांत होती. अशा वेळी कृष्णसखा उत्तरेला समजावीत आहे, परावृत्त करीत आहे, असा तो प्रसंग होता. परीक्षितीला तो प्रसंग पुन:पुन्हा पाहावासा वाटे.

हलक्या पावलांनी कोण आलें ते आंत ? प्रसन्न नाही त्याची मुद्रा. मुखावर माणुसकी नाहीं दिसत. क्रूर दिसतो आहे हा माणूस. कपटी दिसतो आहे हा माणूस. कोण आहे हा ?

"काय पाहतां एवढें, महाराज, त्या चित्रांत ?' त्याने विचारलें.

"कोण वक्रतुंड, तुम्ही केव्हां आलांत ?' परीक्षिति वळून म्हणाला.

"बराच वेळ झाला. मी आपली राजनीतिगृहांत वाट पाहत होतों. शेवटीं भृत्यांना विचारलें.  येथें आहांत असें कळलें.  आपल्या कृपेनें मला कोठेंच प्रतिबंध होत नाहीं.  आलों येथेंच.  परंतु आपणाला बरें नाही का वाटत  आज ? असे डोळे का भरून आले ?' वक्रतुंड गोड बोलत होता.

"वक्रतुंड, हे चित्र मी अनेकदां पाहतों. आई जर सती गेली असती तर माझा जन्महि झाला नसता. मी जन्मलों खरा, परंतु आईचें हास्य मी कधींहि पाहिलें नाही. जिवंत असून ती मृताप्रमाणे राही. तिचें मन तिच्या शरीरांत नव्हतें. तिचे विचार, तिच्या भावना, तिचा आत्मा ही जणूं केव्हांच निघून गेली होतीं. आई रोज क्षणाक्षणाला सती जात होती. हरघडी भाजून निघत होती. माझ्यासाठी ती राहिली. अभागी मी. मी आईच्या गर्भात आलों आणि प्रतापी माझे वडील मी मारले. मी अपशकुनीं आहें, अभद्र आहें. जन्मतांहि पुन्हा मेल्यासारखा जन्मलों. परंतु कृष्णदेवानें सजीव केलें. हें चित्र म्हणजे माझी जन्मकथा, हें चित्र म्हणजे मी जन्माला येणें. परंतु जन्मून तरी काय केलें ?' परीक्षिति थांबला.

"कांही केलें नसशील तर कर. कांहीं तरी अपूर्व करावें, नवीन तेजस्वी असें करावें. राजा, किती तरी दिवसांत माझ्या मनांत विचार खेळत आहेत; परंतु ते अद्याप कोणाला पटत नाहींत. मी सर्वत्र प्रचार करून राहिलों आहें. परंतु राजसत्तेची जोड मिळाल्याशिवाय सारें व्यर्थ असतें. 'यथा राजा तथा प्रजा,' 'राजा कालस्य कारणम्' हीं सारी वचनें खरी आहेत. राजा म्हणजे प्रजेचे दैवत; 'प्रजेतील सारें मांगल्य, सारें पुण्य राजाच्या ठायीं असतें ' असें म्हणतात.  एका दृष्टीने ते खरेंहि आहे. कारण पूर्वी प्रजाच राजाला नेमी ! म्हणजे प्रजेची पूंजीभूत मूर्ति म्हणजे राजा. राजा म्हणजे आपलाच आवाज, आपलेच ध्येय, आपल्याच आशा-आकांक्षा, असें प्रजा पुढें मानूं लागली. समाजांत राजशासनाचा सर्वांत अधिक परिणाम होत असतो. राजाचे जे विचार असतात त्यांना राजपुरुष प्रमाण मानतात. राजाचे प्रधान, सेनापति, सर्व क्षेत्रातील सारे सेवक राजाला जें आवडेल तें करतात.

 

पुढे जाण्यासाठी .......

आस्तिक