बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

गीता हृदय

अध्याय १ ला
महाभारत व रामायण हे आपले राष्ट्रीय ग्रंथ आहेत. ही दोन महाकाव्येंच आहेत असे नव्हें, तर ही काव्यें आपल्या जीवनाशीं एकरूप झाली आहेत. राम, लक्ष्मण, सीता, कृष्ण, अर्जुन, द्रौपदी वगैरे आपल्या जीवनांत मिळून गेली आहेत. जगांतील इतर देशांतहि महाकाव्येंच आहेत. परंतु त्या त्या देशांतील महाकाव्यांतील पात्रें त्या त्या देशांतील जीवनाशीं अशी एकरूप झालेली दिसत नाहीत. रामायण व महाभारत या दोन ग्रंथांनीं भारतीय जीवन बनविलें आहे. वाल्मिकींची प्रतिभा, व्यासांची प्रज्ञा व शुक्राचार्यांचें वैराग्य याला जगांत तुलना नाहीं. रामायणांत प्रतिभेचा अपूर्व विलास आहे. काव्यशक्तीची पराकाष्ठा आहे. परंतु महाभारतांत जणुं विश्व दर्शन आहे. व्यासांची प्रज्ञा सर्व संसाराचे अंतर्बाहृ दर्शन घडवीत आहे. महाभारतांत थोरामोठ्यांचेहि दोष दाखविले आहेत. येथें

दुष्टांचे गुण दाखविले आहेत, सज्जनांच्या उणीवा दाखविल्या आहेत. येथे धर्मराजहि ‘नरो वा कुंजरो वा’ करतो. कृष्णाचा हातांत शस्त्र न धरण्याचा गर्व गळतो. कर्णाची उदार शूरता दिसते. मांडी मोडून पडलेल्या दुर्योधनाचा बाणेदारपणा दिसतो. असें हें एक प्रकारचे भव्य दर्शन आहे. जगांत केवळ निर्दोष एक परमेश्वर आहे. व्यासांनीं अठरा पुराणें लिहिली. महाभारत लिहिले. सागराप्रमाणें अगाध व अनंत असें त्यांचें हें वाङ्मय आहे. सामान्य मानव हें सारें केव्हां पाहणार? व्यासांनी आपला संदेश थोडक्यांत सुटसुटितपणें कोठें नाही का सांगून ठेवला? शेकडों कथा, व्याख्यानें, उपाख्यानें, शेकडो उपदेश यांतून त्यांनी जे सांगितलें त्याचा सारांश, त्याचें नवनीत त्यांनी कोठें काढून दिलें आहे का? होय, त्यांचा संदेश श्रीमद्भगवद्गीतेंत आहे. व्यासांच्या सर्व शिकवणीचें सार म्हणजे श्रीगीता होय.

हिंदुधर्माचा सुटसुटित असा एक ग्रंथ सांगा असें कोणी म्हटलें तर गीता आपण पुढें करूं. हिंदुधर्मांतील सर्व उदात्त भवनांचा व विचारांचा हा साररूप ज्ञानकोश आहे. अमुक एक विचार येथें आला नाही असें नाही. गीता किती लहान. फक्त सातशें श्लोक. परंतु वामनाच्या एका पावलांत सर्व त्रिभुवन यावें त्याप्रमाणें सारें तत्त्वज्ञान या सातशें श्लोकांत आलें आहे. चंद्रबिंब बचकेएवढें दिसलें तरी सा-या पृथ्वीला धवळितें. त्याप्रमाणे ही लहानशी गीता सर्व मानवी संसाराला प्रकाश देत आहे.

महाभारताच्या मध्याभागी गीतेचा हा नंदादीप, हा दीपस्तंभ उभा आहे. महाभारताची अठरा पर्वें, गीतेचेहि अठरा अध्याय. अठरा अक्षौहिणी सैन्याच्यामध्यें गीता जन्मली. श्रीकृष्णांनी गीता सांगितली, अर्जुनानें ती ऐकिली, व्यासांनी ग्रंथिली. या तिघांची जणुं एकरूपता झाली आहे. व्यासांना कृष्णद्वैपायन म्हणतात. अर्जुनालाहि कृष्ण नांव आहे. सारेच जणुं कृष्णमय झाले. अर्जुनानें आपल्या रथाचे दोर श्रीकृष्णाच्या हातांत दिले होते. परंतु त्याच्याहि आधी त्यानें आपल्या मनाचे दोर त्याच्या हातांत दिले होते. अर्जुन या शब्दाचा अर्थ काय? जो ऋजु आहे तो अर्जुन. ऋजु म्हणजे सरळ. अर्जुनाचा सरळ भाव, शुद्ध भक्ति. जो सरळ व निर्मळ मनाचा असतो तो हृदयांतील श्रीकृष्णाला शरण जातो. कृष्ण म्हणजे कर्षून घेणारा, ओढून घेणारा, इंद्रियांना सन्मार्गावर ठेवूं पाहणारा. ज्ञान स्वरूप अंतरात्मा म्हणजेच कृष्ण. वाणी कोण ऐकतो? जो ऋजु आहे, शुद्ध वृत्तीचा आहे तोच ऐकतो.

अर्जुन युद्धासाठीं प्रवृत्त झाला होता. तो महावीर होता. त्याला “नर” अशी श्रेष्ठ पदवी होती. असा हा अर्जुन श्रीकृष्णाला माझा रथ हांक, बघूं दे कोण कोण युद्धार्थ उभे आहेत, असें म्हणतो. भगवान रथ हांकतात. अर्जुन उभा राहून सर्वत्र पाहतो. त्याला सारे स्वजन दिसतात. आप्त, सखेसोयरे, गुरू दिसतात. मारणमरणाच्या निश्चयानें ते सारे जमलेले असतात. ती मामुली लढायी नव्हती. अखेरची सोक्षमोक्षाची लढायी होती. अटीतटीची लढायी होती. तें दृश्य पाहून अर्जुन दु:खी होतो. युद्ध ही अति भयंकर वस्तु आहे असें त्याला वाटतें. त्याच्या डोळ्यांतून पाणी येतें. त्या धनुर्धराचें धनुष्य गळतें. तो देवाला म्हणतो “देवा, या सर्वांना मारून मिळणारें राज्य काय कामाचें? रक्ताने माखलेले सुखभोग भोगणें पाप आहे. हे सारे आप्तेष्ट कसे मारूं? गुरूजन कसे वधूं? हे लाखों वीरपुरूष मरतील. लाखों मायबहिणी विधवा होतील. व्यभिचार माजतील. कुलधर्म लोपतील. छे :! नको हें युद्ध. संन्यासधर्मच बरा. तोच श्रेष्ठ आहे. खरोखर मीं काय करावें तें मला समजत नाही. तूंच गुरू. तूंच मार्ग दाखव.”

 

पुढे जाण्यासाठी .......

गीता हृदय