रविवार, मार्च 07, 2021
   
Text Size

गीता हृदय

अध्याय ४ था
संसार सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. तो सोडूं म्हणतां सोडतां येत नाहीं. प्राणिमात्राच्या पाठीमागें कर्म हें सारखें लागलेलेंच आहे. झोंपणें हें सुद्धां क्रिया-पद आहे. बसणे हें सुद्धां क्रिया-पद. बसून बसून पाय दुखूं लागले म्हणतात. अशा या परिस्थितींत कर्मे कशीं टाळणार?

कर्मे टाळाल तर देहयात्रा होणार नाहीं. चित्तशुद्धि लाभणार नाही. ज्ञानाचा उदय होणार नाही. समाजांत दंभ माजेल. म्हणून सदैव कर्म करीत रहावें. त्याचा कंटाळा करूं नये. स्वत:च्या आवडीचें कर्म हाती घ्या. त्यांत रमून जा.

नुसतें बाह्य कर्म तारक नाही. बाह्य कर्माला किंमत कशानें प्राप्त होते? बाहेरच्या सामान्य कर्मांतून आपण मोक्षाची अमृतधार कशी मिळवावयाची तें ह्या चौथ्या अध्यायांत सांगितलें आहे.

चौथ्या अध्यायांत तीन शब्द आलेले आहेत: १ कर्म २ विकर्म ३ अकर्म.

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण:।
अकर्मणोऽपि बोद्धव्यं गहना कर्मणो गति: ।।


कर्म काय, विकर्म काय, अकर्म काय, तें सारें समजून घेतलें पाहिजे. कर्माचा महिमा अपार आहे. कर्माची गहनगंभीर गति मोक्षाच्या समुद्रास नेऊन मिळविल. परंतु नीट समजून घेऊं तर.

कर्म म्हणजे बाहेरचें स्थूल कर्म. परंतु विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे विशेष कर्म. अधिक महत्वाचें काम. विकर्म म्हणजे मनोमय कर्म. समजा, रस्त्यांत एकादा ओळखीचा मनुष्य भेटला. आपण त्याला नमस्कार करतों. परंतु त्या नमस्कारांत जर आपलें मन नसेल, तो जर देखल्या देवा दंडवत असेल तर त्या नमस्काराचा काय उपयोग? तो नमस्कार आपणांस बोजा वाटतो. तें नमस्काराचें कर्म आपणांस मुक्त न करतां उलट बद्ध करतें. डोक्यावर जणुं ओझें देतें.

आपल्या कर्मांत मनाचा सहकार हवा. आपल्या कर्मांत आत्मा ओतलेला असला पाहिजे. म्हणजे तें कर्महि नीट होतें आणि त्या कर्माचा बोजा वाटत नाहीं. कबीर वस्त्रें विणी तेव्हां

“झिनी झिनी झिनी
विनी चदरीया”


असें गाणे म्हणत रंगे. बाजारांत कबीर आपली ती सणंगे घेऊन बसला कीं लोक त्या सणंगाकडे बघत रहात. तीं जणुं अमोल वाटत. कारण त्या वस्त्रांत कबीराचा आत्मा होता. कारण त्याचें हृदय तेथें ओतलेले असें. हृदयाची किंमत कोण करणार?

 

पुढे जाण्यासाठी .......

गीता हृदय