बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

*कलिंगडाच्या साली

मी तेव्हां मुंबईस होतों. आणि ते उन्हाळ्याचे दिवस. रात्रभर मला झोंप आली नव्हती. जेथें रहात होतों तेथें ना वारा ना कांहीं. मुंबईंत राहणें महाकर्म कठीण असें वाटलें. मला नेहमीं उघड्यावर राहावयाची संवय. परंतु मुंबईंत मी उघड्यावर कोठें झोंपणार ? परंतु मीं जेथें होतो तेथें झोंपायला जागा तरी होती. माझ्यासमोर तीं लाखों माणसें आलीं जीं एकेका खोलींत डझनावरी राहातात. त्यांची काय दशा असेल ? फुटपाथवर तीं झोंपतात. परंतु पावसाळ्यांत काय करीत असतील ? कधीं त्यांना राहायला नीट चाळी मिळतील ?  रात्रभर या विचारांत मी होतों. पहांटे जरा डोळा लागला. परंतु लौकर उठलों. एका मित्राला अगदी उजाडायला भेटायला जायचें होतें. उठणें भाग होतें. आणि चाळींतील हालचालीमुळेंहि, लागलेला डोळा लगेच उघडला. शहरांत केव्हांच रहदारी सुरूं होती. बाराएकला मिलमधील कामगार सुटतात. शेवटची ट्रँम मुंबईला एक वाजतां परतते. तों दोनतीन तासांनी पुन्हां सुरूं. लोकल गाड्या तीनपासून पुन्हां सुरूं. दूधवाले भय्ये तीनसाडेतीनपासून स्टेशनवरून दिसूं लागतात. आणि पाण्याचें होतें तेव्हां दुर्भिक्ष. उन्हाळ्यामुळे पाणी कमी. पहांटे तीनसाडेतीनपासूनच मायबहिणी उठायच्या. नळावर भांड्याचे आवाज. गाण्यांचे आवाज. परीक्षा जवळ आल्या होत्या. मुलेंहि लौकर उठून वांचू लागली होतीं. मी तेथें गॅलरींत कसा झोंपणार ? सर्वत्र कर्ममय जागृति असतां मी का लोळत रांहू ? मीहि उठलों. थोड्या वेळानें मित्राची भेट घ्यायला बाहेर पडलों.

मला ग्रँटरोडच्या बाजूला जायचें होतें. दादरला गाडींत बसलों. वसईहून आलेली मंडळी अजून बांकावर झोंपलेली होती. लोक त्यांना उठवीत होते. तीं जांभया देत उठत होतीं. मी बाजूला बसलों. काय हें जीवन, असें मनांत येई. कृत्रिम, अनैसर्गिक जीवन. दूधवाले भय्ये हां उठत असतील ? ते कष्ट त्यांनींच काढावे. आणि दिवसा तेथेंच गोठ्याजवळ चार्‍यावर झोंपतांना मी त्यांना पाहिलें आहे. त्यांना कोणी उठवूं लागलें म्हणजे वाईट वाटे. परंतु सर्वांचीच धांवपळ. कोणीं कुणास दोष द्यावा ?

ग्रँटरोड आलें, मी पटकन उतरलों. आतां चांगले उजाडलें होतें. मी झपझप चाललो होतों. तों एक कुरूप दृश्य मला दिसलें. काय पाहिलें ? झाडूवाले लांब केरसुण्यांनीं कचरा गोळा करीत होते. झाडूवाल्या मायबहिणी गोळा केलेला कचरा टोपल्यांनीं एकत्र करीत होत्या. वास्तविक ठायींठायीं खांबांना कचरापेट्या आहेत. परंतु त्यांत कपटे, कचरा, सालें टाकायची आपल्या लोकांस अजून संवय नाहीं. सुशिक्षित माणसेंहि खिडकीतून खाली फेकतात. सार्वजनिक नीतीचा सद्‍गुणच नाहीं. आगगाडींत तेथेंच शेंगा खाऊन सालें टाकतील. संत्री खाऊन घाण करतील तेथेंच थुंकतील. सिगारेटची थोटकें टाकतील. खिशांतील कागत फेंकतील. स्वच्छ डबा घाण करून ठेवतात. आणि रस्त्यावरची घाण तर विचारूंच नका. सार्वजनिक स्वच्छता हें राष्ट्र कधीं शिकणार ?

उन्हाळ्याचे दिवस. खानदेशांतील फळांची मला आठवण येई. तिकडील नद्यांच्या पात्रांत उन्हाळचीं फळें अपार होतात. टरबुजें, खरबुजे, साखरपेट्या, गुळभेल्या, नाना फळें. मुंबईलाहि तीं येतात. कलिंगडाच्या राशी मुंबईला ठयींठायीं दिसत. फुटपाथवर कलिंगडवाले बसतात. फांकी करून ठेवलेल्या- येणारे जाणारे घेत आहेत. खाऊन साली फेंकींत आहेत. असें सकाळपासून शेवटचा सिनेमा सुटेपर्यंत चालायचेंच. तो लाल थंडगार गर ! कलिंगडें कापून देणारे जवळ एक भांडें ठेवतात, त्यांत कापतांना पडणारा रस सांठवतात. तो रसहि कोणी रसिक पितात ! लालसर सुंदर रस. कलिंगड अद्‍भुत वस्तू. फुलेंफळें ही एक थोर सृष्टि आहे. कलिंगडाचा तो लाल रंग किती सुंदर दिसतो ! आणि मधून डोकावणार्‍या त्या काळ्या बिया. त्या वाळूंतून एवढी माधुरी प्रकट होते. हे रंग, हे रस नद्यांच्या वाळवंटांतून मिळतात. गंमत वाटते नेहमी मला.

 

पुढे जाण्यासाठी .......

कलिंगडाच्या साली