“दादा !”
“कोणी हांक मारली ? मी पाहिले. तो दारांत धर्मा उभा.
“ये धर्मा ये आंत ये बस.”
“तुमच्याजवळ कसें बसायचे भंगीकाम करणारे आम्ही.”
“म्हणजेच माझ्या आईसारखे. ये धर्मा.”
“धर्मा आंत आला. माझ्या घोंगडीवर बसला. त्याच्या हातांत कागद होता.
“पत्र आलें वाटतें घरचें ?”
“पत्र येऊन चार दिवस झाले.”
“कोणी वाचून दाखवलें ?”
नेहमीं तुम्हांला किती त्रास द्यायचा ? दुसर्याकडून घेतले वाचून. परंतु कागदाचा जबाब तुम्हीच लिहा. तुम्ही पोराला चार गोष्टी समजावून सांगा. पोरगा बिघडला बघा. वाचा हा कागद.”
तें पत्र मी घेतलें नि वाचलें. काय होतें त्यांत ?
“रा.रा. धर्मास रमीचा कागद.
तुम्ही पोराला लाडावून ठेवलात. फार शेफारला. तुम्ही कैदेंत. संसार कसा मी चालवू ? धाकटी जानकी सुद्धा मोळी घेऊन विकायला जाते. परंतु हा रामा एवढा मोठा पोर. त्यानं कां काम करूं नये ? खोताने कामाला बोलावले होतें. दोन दिवस गेला. परंतु तेरोज उठेच ना. अरे पोरा उठ लक्कन, कामाला जा. खाल काय ? ऊठ. असें मी म्हटलें. तर सापाप्रमाणें अंगावर आला. नाही जात कामाला असें म्हणाला. या पोरांनें का माझ्या अंगावर धांवून यांवे ? याला जन्म दिला तो का यासाठीं ? दोन गोष्टी या पोराला लिहा. तुम्ही कधीं सुटणार ? मला धीर नाहीं धरवत. सखू तर अगदी उघडी. चिंधी नाहीं तिच्या अंगावर. परंतु तुम्ही काय कराल ? प्रकृति सांभाळा, जिवास जपा. खोताचे कोठार कशाला फोडायला गेलांत ? आणखी थोडें उपास घडले असते. नशिबांतले थोडंच चुकणार. तुमच्या वाटेकडे डोळे आहेत. पोराला समजुतीचा कागद लिहा.”
मी तें पत्र वाचलें. मला वाईट वाटलें. मी त्यादिवशी माझ्या देवाघरी गेलेल्या आईच्या विचारांत होतों आणि हें पत्र एका मातेचेंच होतें. श्यामच्या आईतील श्याम आपल्या आईवर अपार प्रेम करी. तो तिचें काम करी, तिचे पाय चुरी; परंतु धर्मांचा हा रामा, हा आपल्या आईच्या अंगावर धांवून जातो, हात उगारतो. कां बरें असें ? कां हा फरक ? रामाचें का आईवर प्रेम नव्हतें ? परंतु तें प्रेम दारिद्र्यांत गोठून गेले. थंडीच्या दिवसांत श्याम लौकर उठला तर त्याची आई म्हणे, नीज अजून जरा. इतक्या लौकर कशाला उठतोस ?” परंतु रामला त्याची आई थंडीत उठवत, कामाला जा म्हणे, मोळी आण म्हणते. दोन दिवस रामा उठला. त्या दिवशीं त्याला कंटाळा आला असेल. पांघरून घेऊन पडला असेल. बारा वर्षांचा तो पोरं. लकडा लावला. तो संतापून तिला मारायला धांवला. नाहीं जात कामाला म्हणाला. कोणाचा दोष ?
“बघा लिहून. परंतु हें मिंधेपणाचें जिणें. कोणाचें उपकार नये घेऊं बघा. जीव मरतो, गुदमरतो.” मला एका लेखकाचे शब्द आठवले. भांडवलशाही समाजरचनेंत आत्मा मारला जातो, व्यक्तित्व मारलें जातें. आपण आगतिक होतो. स्वत:ला आशा, आकांक्षा, स्वप्नें, सारें दूर ठेवावे लागतें. दुसर्याच्या लहरीवर नाचावें लागतें, त्याला आवडेल असें बोलावें लागतें. तो सांगेल हें करावें लागतें. धर्मा म्हणाला जीव मरतो, गुदमरतो. केवढे सत्य, केवढी ही हिंसा ? हिंसा म्हणजे केवळ मान कांपणें, खंजीर भोसकणें, गोळी झाडणें एवढीच नव्हे; दुसर्यांच्या जीवांचा गुदमरा करून स्वत: सुखविलासांत राहणारे हिंसकच नव्हत का ? अधिक हिंसक. कारण तें आत्म्याचे मारेकरी गांधीजी म्हणाले होते, ब्रिटिश सत्तेनें केलेलें सर्वांत मोठें पाप, म्हणजे हिंदी राष्ट्राचा आत्माच मारला. या आत्म्याचा उद्धार कसा व्हायचा ? भांडवलशाहींत हें शक्य नाहीं. हुकुमशाही कम्युनिझम तेहि आत्मा, मारणारच, आत्म्याचा, मनोबुद्धीचा कोंडमारा न करता अन्नवस्त्र आनंद, लोकशाही समाजवादच कदाचित् देऊं शकेल. तीच एक आशा.
तिकडून पोलिस अंमलदार आला. धर्मा उठून केरसुणी मारूं लागला. मीहि निघून गेलों. माझ्या एका मित्राला मी लिहिलें. त्यानें धर्माच्या घरीं दहा रुपये पाठवले. धर्मालाहि पैसे मिळाल्याचा आनंद झाला. “भाऊ, पोरं रातचीं सुखानं झोंपतील. तुम्ही या आमच्या गांवाला. लागतील का तुमचे पाय ?”
“धर्मा, असें म्हणू नकोस. आपण सारीं साधीं माणसें. मी मूळचा तिकडचाच. पालवणीला मागे एक संन्यासी रहात होते.”
“ते बोबा जंगलांतील सांबाच्या देवळांत रहात. वाघरूहि आसपास असायचें. परंतु ते लंगोटीबाबा भीत नसत.”
“मी त्यांना भेटलों होतों. मला तिकडच्या आठवणी येतात. तुमच्या तिकडचीं करवंदे, काजू, कोकंब, बोंडे, सारे मेवे आठवतात. ती लालमाती, ते जांभे दगड, सारें आठवतें. परंतु मी पोटासाठी दूर, गेलो धर्मा.”
“पुन्हां या तुमच्या मुलखांत. आमच्यांत रहा. आमच्या पोरांना शिकवा. मी सुटेन सहा महिन्यांनीं. तुम्ही कधीं सुटाल संमदे ?”
“तडजोड झाली तर सुटूं. स्वराज्याशिवाय तडजोड नाहीं. परंतु धर्मा, तुला मी विसरणार नाहीं.”
दिवस गेले. त्यादिवशीं मी जरा खिन्न होतों. कधीं कधीं अकस्मात मला आईची आठवण येते नि मी त्यादिवशीं दु:खी होतों. जणू ती बोलावित आहे असें वाटतें. मी माझ्या विचारांत होतों. भावसमाधींत होतों.