गुरुवार, जुन 20, 2019
   
Text Size

पत्र तिसरे

मागें एक मित्र एकदां मला म्हणाले, '' तुम्ही समानतेच्या गप्पा मारतां मग हरिजनांनाच आर्थिक शिष्यवृत्या कां देतां? '' असा प्रश्न कोणी कोणी विचारतात. परंतु समानता याचा अर्थ काय? ज्यांची आजपर्यत उपेक्षा झाली त्यांना अधिक देणें  म्हणजे समानता. म्हणून हरिजनांना अधिक सवलती दिल्या पाहिजेत. त्यांना गोडी लावली पाहिजे.

ज्यांच्यावर हजारों वर्षे आपण अन्याय केले, ज्यांच्या जवळून भरपूर सेवा घेऊन त्यांना पशुसम स्थितीत ठेवलें, त्यांच्या बाबतीत कर्तव्य करावयास नम्रपणें आतां तरी आपण उभें राहूं या. तोंडदेखली सहानुभूति नको. तोंडपाटीलकी करण्यांत आपला हातखंडा आहे. परंतु प्रत्यक्ष कृतींच्या नांवाने शून्याकार ! येतांजातां या उपेक्षित बंधूची स्मृति आपण ठेवूं या. जास्तीत जास्त मदत त्यांच्या उध्दारार्थ करुं या. आपण भांडीं बाहेरुन घांसतो, परंतु आंत काळें असतें. तसें आपलें होतां कामा नयें. वरुन प्रेम नको, आंतहि प्रेमाचा प्रकाश भरुं दे. हरिजन आपल्या घरीं आणा. त्यांना तुमच्या घरीं शिकण्यासाठी ठेवा. त्यांच्या शिकण्याची व्यवस्था करा. हरिजन नोकरचाकर घरांत हिंडूं देत, वावरुं देत. ' शिवूं नको धर्म ' पुरें झाला. माणुसकीचा प्रेममय धर्म आणूं या.


आणि सेवा करून कांही अपेक्षा धरूं नका. थोडी सेवा करून लगेच '' हे हरिजन तर काँग्रेसचे सभासद होत नाहींत '' असे म्हणूं नका. आज आपली सत्त्वपरीक्षा आहे. हजारों वर्षे केलेले अन्याय दहा पांच वर्षाच्या अल्पशा सेवेनें हरिजन कसे विसरणार? तुमची ही सेवा वरपांगी, तात्पुरती, राजकीय कामापुरती आहे असें त्यांना वाटले तर त्यांचा काय दोष? तुमची सेवा जिव्हाळयाची आहे की नाही याची कसोटी ते घेतील. डॉ. आंबेडकर हरिजनांना कायमचे निराळे करूं पहात होते. ब्रिटिश सरकारचें धोरण फाटाफुटी पाडण्याचें. त्यांनीं त्याप्रमाणें करावयाचें ठरविले. परंतु महात्माजींनीं प्राणांतिक उपोषण करावयाचे ठरवून ब्रिटिश राजनीतीला हिंदुधर्मांची हीं दोन शकलें करूं दिली नाहींत. परंतु आतांच तर खरी परीक्षा आहे. वास्तविक डॉ. आंबेडकरांना इतर सर्व पक्षांपेक्षा काँग्रेस अधिक जवळची वाटावी. परंतु ते ! इतर सर्व वर्गांना, इतर सर्व पक्षांना जवळ करतील आणि काँग्रेसला शिव्याशाप देतील. हरिजनांना दूर ठेवणा-यासहि ते हरिजनांची मतें देववतील, परंतु हरिजनांसाठी इतर सर्वांहून अधिक काम करणारी जी काँग्रेस तिच्या उमेदवारास पाडण्याची ते खटपट करतील !

अशा वेळेस जर आपण त्रासून म्हणूं, '' आपण यांच्यासाठी सहानुभूति दाखवावी, आपण यांच्यासाठी स्वत:च्या आप्तेष्ठांपासून दूर व्हावे. तर यांचे आपणांस अधिकच शिव्याशाप ! काय करायचे? काय करायचे यांची सेवा करुन; हे कृतघ्न लोक आहेत. '' जर असें आपण म्हणूं तर परीक्षेंत नापास होऊं. याच गोष्टीची श्री. आंबेडकर वाट पहात आहेत. ते मग लगेच दुनियेला सांगतील, '' पहा यांची सेवा थांबली. याची तात्पुरती वरपांगी कळकळ होती. आम्ही व हे कधींहि जवळ येऊं शकणार नाही. आम्ही अलग असणेंच बरें. ''

 

पुढे जाण्यासाठी .......