शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

पत्र सहावे

विकासाचा आरंभ मंगल

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

आज सायंकाळी आकाशांत बीजेची चंद्रकोर दिसत होती. लहानपणीं आम्ही द्वितीयेची ही  चंद्रकोर पाहण्यासाठी  धडपड करीत असूं. आणि दिसली कीं, ती एकमेकांस दाखवीत असूं. सुताचा धागा त्या चंद्राला वाहून जुनें घे, नवें दे, असें नमस्कार करुन म्हणत असूं. या चंद्रकोरेची इतकी कां बरें महति? कारण ती वर्धिष्णु आहे. विकासाचा तो आरंभ आहे. कोणताहि विकासाचा आरंभ मंगल आहे. श्री. शिवछत्रपतींची जी राजमुद्रा होती तींत ' प्रतिपच्चंद्ररेखेव ' असें तिला म्हटलें आहे. शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा शुक्ल पंक्षातील चंद्राप्रमाणें वर्धिष्णु आहे असें त्या श्लोकांत आहे.

आकाशांतील चंद्र म्हणजे सृष्टीचें महाकाव्य आहे. परंतु वसंता, मध्यें मी कोंकणांत गेलों होतों. तेथें मला एक विचित्र अनुभव आला. माझ्या मनाला त्यामुळें मोठा धक्का बसला. मी माझ्या लहानपणाच्या एका मित्राला मोठया प्रेमानें भेटावयास गेलों होतों. त्याचा एक सात आठ वर्षाचा मुलगा होता. मोठा तरतरीत होता तो मुलगा. त्याचे डोळे तेजस्वी होते. माझा मित्र आपल्या मुलाला म्हणाला, '' बाळ हे पाहुणे आले आहेत; त्यांना चित्र काढून  दाखव. ''

त्या मुलाच्या बोटांत उपजतच जणुं चित्रकला होती. कांहीं तरी पाटीवर काढावें असा त्याला नाद होता. तो बाळ हातांत पाटी घेऊन गेला व थोडया वेळानें तो परत आला. त्या पाटीवर त्यानें चंद्र-सूर्य, फुलें वगैरेंचीं चित्रें काढली होती. माझ्या मित्रानें ती पाटी हातांत घेतली. परंतु त्या पाटीवर चंद्र काढलेला पाहून तो रागावला. '' अरे, हा मुसलमानांचा चंद्र कशाला काढलास? पुसून टाक तो ! '' असें संतापून म्हणाला. तो लहान मुलगा पहातच राहिला. मी तर चकितच झालों. मुसलमानांचें अर्धचंद्राचें निशाण आहे. म्हणून का हिंदु मुलानें पाटीवर चंद्रहि काढूं नये? त्या मुलाच्या मनावर केवढा हा आघात ! मी त्या माझ्या मित्राला म्हटलें, '' असे चंद्र हा सर्व विश्वाचा आहे. आपल्या बायका सकाळीं सडा घातल्यावर जी रांगोळी काढतात, तींत चंद्र-सूर्य काढतात. चंद्र-सूर्य आकाशांत नसून माझ्या अंगणात आहेत इतकें माझें अंगण भाग्यवान व पवित्र, असें जणुं त्या दाखवतात. स्वर्ग दूर नसून माझ्या दारीं आहे असा जणुं त्यांत भाव असतो. अरे, लहानपणी आईच्या कडेवर बसून ' चांदोबा, चांदोबा भागलास का? ' हें गाणें आपण शिकलों व म्हटलें. संकष्टी चतुर्थीला चंद्राचा केवढा महिमा. आपण चांद्रायण व्रतहि करतों. चंद्र का फक्त मुसलमानांचा? कां रे ऐवढा मुसमानांचा द्वेष? इतका द्वेष करुन काय मिळणार आहे.?

 

पुढे जाण्यासाठी .......