शनिवार, मे 25, 2019
   
Text Size

पत्र चवदावे

कला व जीवन
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.

मागे तूं वर्धा योजनेविषयी विचारलेस. आज पुन्हा तूं असाच एक प्रश्न विचारला आहेस. आजकाल साहित्य व जीवन यांची चर्चा फार होत असते. हाच प्रश्न निराळया दृष्टिने मांडला तर कला व जीवन असा मांडावा लागेल. कारण साहित्य म्हणजे एक कलाच आहे. साहित्य या शब्दाचा अर्थच मुळी जें सदैव जीवनाच्यासह असतें ते. जीवनापासून वाङमयाची किंवा कोणत्याच कलेंची फारकत करतां येणार नाही.

जीवनाची कला ही सर्वश्रेष्ठ कला. या जीवनाच्या कलेंभोवती बाकीच्या इतर कलांनी उभे राहिलें पाहिजे. सात भिन्न भिन्न सुरांतून जो संगीत काढतो त्याची आपण वाहवा करतो. मग आजूबाजूच्या विविध अशा अनंत जीवनांतून संगीत  निर्मिण्याची जो खटपट करतो तो केवढा बरे कलावान ! आज महात्माजी किंवा माझी काँग्रेस हिंदुस्थानांतील नाना धर्म, नाना जातीजमाती, नाना वर्ग यांच्यामध्ये मेळ निर्माण करुं पहात आहेत. हिंदुस्थानातील चाळीस कोटी कंठांतून प्रमाचे ऐक्याचे, आनंदाचे असं संगीत बाहेर पडावें म्हणून खटपट  करीत आहेत. महात्माजी जीवनाच्या कलेंच उपासक आहेत. ते सर्व थोर कलावान.

एकदां पूज्य विनाबाजींकडे एक मित्र सुंदरसे चित्र घेऊन गेला. विनाबाजींना संगीत, चित्रकला, साहित्य सर्वांची अपार गोडी आहे. परंतु जीवनाच्या कलेची गोडी त्यांना सर्वांत अधिक आहे. हा मित्र विनोबाजींस म्हणूं लागला, 'हे पहा उत्कृष्ट चित्र. हे पहा त्यांतील रंग ! हा गुलाबी रंग येथे किती खुलून दिसतो.'

विनोबाजींनी क्षणभर ते चित्र पाहिले. पुन्हा ते सूत कातूं लागले. ते काही बोलेले नाहीत. तो मित्र रागावला. म्हणाला 'तुम्ही गांधीचे लोक असेच अरसिक. तुम्ही जड-भरत आहांत !'

पू. विनांबाजी त्याला म्हणाले, 'आम्हीही  कलेचे उपासक आहोंत. चल, दाखवतो तुला रसिकता!' असे म्हणून ते उठले. तो मित्रही त्यांच्याबरोबर निघाला. जातां जातां दोघे हरिजन वस्तीकडे वळले.

"इकडे कोठे नेता मला? इकडे तर घाण आहे.'

"माझी कला इकडेंच आहे.' शांतपणे विनांबाजी म्हणाले.

विनोबाजी तेथे जाताच हरिजन मुले त्यांच्याभोवती प्रमाने जमली. विनोबाजी त्या गृहस्थास म्हणाले, 'तू तुझें ते चित्र ५० रु. स. विकत घेतलेंस. ते ५० रुपये या मुलांना रोज दूध देण्यात खर्चिले असतेस तर हया मुलांच्या गालांवर गुलाबी छटा आली असती. ही देवाची चित्रे जरा सुंदर दिसली असती. चित्रांतील गुलाबी रंग महत्वाचा की या दरिद्री मुलांच्या मुखांवर गुलाबी असा अरोग्याचा रंग आला तर तो अधिक महत्वाचा?'

 

पुढे जाण्यासाठी .......