सोमवार, मे 20, 2019
   
Text Size

गोड निबंध-भाग ३

त्याप्रमाणें आपले जीवनांतून जें पुस्तक बाहेर पडलें त्याचे पैसे घेणें कसें तरी वाटतें. अगतिक होऊन एकाद्या साहित्यिकानें पैसे घेणें निराळें, परंतु तो आपध्दर्म झाला. अशानें साहित्य स्वस्त होईल. किंमत कमी होण्यासाठीं पुस्तक खूप खपलें पाहिजें. तें खपण्यासाठीं जनतेच्या जीवनांतील प्रश्न हातीं घ्या. शेंकडों अन्याय, शेंकडों दु:खें समाजांत आहेंत. रोज करुण कहाण्या खेडोंपाडीं अश्रूंनीं लिहिल्या जात आहेत. कामगारांचा संप म्हणजे काय हें पहाण्यासाठी प्रो. ना. सी. फडके त्या ७ नोव्हेंबरला मुंबईस आले होते ! परंतु ती विराट सभा एकदां पाहून काय होणार ?ज्याला प्रतिभा आहे, ज्याच्या लेखणींत प्रसाद आहे, त्यानें या लोकांत राहिलें पाहिजे. त्यांच्या चाळींत राहिलें पाहिजे. रवींद्रनाथांनी लिहिलें आहे, “माझा हा दिवाणखान्यांतील नमस्कार दु:खीकष्टी लोकांत वावरणार्‍या दरिद्रनारायणाला कसा पोहोंचेल ?” खरें आहे. दिवाणखाने सोडून खाली याल तेव्हांच काम भागेल. गंगेनें स्वर्गांत राहून चालणार नाहीं. गंगेनें खालीं मैदानांत आले पाहिजे. आमची वाग्गंगा अजून स्वर्गांत आहे. माड्या महालांत, आरामखुर्चीत, पलंगावर ती आहे. तिचें खालीं अवतरण होईल तेव्हांच जनतेचें दर्शन तिला व तिचें दर्शन जनतेला होऊन संसार समृध्द होऊं लागेल.

समाजांत रुढी आहे, दंभ आहे, अज्ञान आहे, आलस्य आहे, खोटे श्रेष्ठ कनिष्ठाणाचे भाव आहेत, बेकारी आहे, रोग आहेत, जुलूम आहेत. योग्य शिक्षण नाहीं, योग्य मार्गदर्शन नाहीं. स्त्रियांची गुलामगिरी, हरिजनांची गुलामगिरी, किसान कामगारांची गुलामगिरी-शतमुखी गुलामगिरी आहे. “गिर्‍या गिर्‍या गिरण सोड” हेंच अद्याप आम्ही ओरडत आहोंत;  ज्ञानाचा प्रकाशच कोठें नाहीं. शास्त्रांचा अस्त, सत्कलांचा अस्त, अर्थहीन चित्रें, अर्थहीन लिहिणें, प्राण कोठेंच नाहीं.
“अवघाचि संसार सुखाचा करीन”

या प्रतिज्ञेनें कोण हातीं लेखणी धरतो, कोण कुंचली धरतो ?

शास्त्रीय ज्ञानाचीं सोपी मनोरंजक पुस्तकें स्वस्त करुन पाठवा कान्याकोपर्‍यांत. भारतीय इतिहासांतील थोरांची चरित्रें रसरशीत लिहून पाठवा सर्वत्र, जगांतील इतिहासाचें थोडक्यांत सार द्या काढून. संघटनेचीं सूत्रें कळूं देत सर्वांना. शिक्षणाचें महत्व पटवा लोकांना. आरोग्याची महती शिकवा त्यांना. माणुसकीचा धर्म न्या घरोघर. स्वत:ची ओळख, विशाल भारताची ओळख, जगाची ओळख, त्यांना करुन द्या. प्रयत्नशील पुरुषार्थांसाठीं उठतील असें जनतेस द्या कांहीं. मृतप्राय पडलेल्या समाजास संजीवनी द्या. खडबडून समाज उठूं दे. ध्रुवाच्या गालास नारायणाच्या बोटाचा स्पर्श होतांच तो वेद बोलूं लागला. तुमच्या बोटांतील लेखणीचा जनतेस स्पर्श होतांच तिच्यांत चैतन्य शिरलें पाहिजे, ती मुकी राहतां कामा नये. शेतकर्‍याचें असें गाणें लिहा कीं तें ऐकून मुका शेतकरी बोलका झाला पाहिजे. कामगाराचें असें गाणें लिहा कीं त्याची लवलेली मान उंच होईल. समाजांत तेज ओता, सहानुभूति निर्मा, जिवंतपणा आणा. नरक नाहींसा करुन स्वर्ग निर्माण करण्याची उत्कटता जनतेंत आणा.

 

पुढे जाण्यासाठी .......