शनिवार, मे 25, 2019
   
Text Size

चरित्र-विभाग

ज्ञाननिष्ठ नचिकेता
फार प्राचीन काळची गोष्ट. प्राचीन म्हणजे सत्ययुगांतील. त्या काळांत लोक सत्याची पूजा करीत. असार टाकून घेऊन सार वस्तु ते संग्रहीं ठेवीत. अशा त्या काळांत या आपल्या पुण्यभूमींत नचिकेता नांवाचा एक बालक जन्मला होता. नचिकेता हा दीन दुबळ्याचा मुलगा नव्हता; तो एका संपन्न व प्रतापी राजाचा पुत्र होता. बापाच्या पाठीमागून तो त्या समृध्द राज्याचा स्वामी व्हावयाचा होता. परंतु भौमिक राज्याचा स्वामी होण्याचे त्याच्या नशीबीं नव्हतें. तो पारमार्थिक साम्राज्याचा सम्राट होणार होता.

राजाची धनदौलत अलोट होती. त्याचें भांडागार भरलेलें होतें. त्याचा जामदारखाना लुटूं लागलें असतांहि लुटला गेला नसता. हत्ती, घोडे, रथ कशासच गणति नव्हती. हजारों दासदासीनीं त्याचे राजवाडे गजबजलेले असत. संपत्तीमध्यें राजा जसा अद्वितीय, त्याप्रमाणें दानधर्मांतहि तो अद्वितीय होता. दानध्यान, जपयज्ञ, होमहवन यांत त्याचा पुष्कळ वेळ खर्च होई. प्रजेच्या मुखीं राजाचा जय व शत्रूच्या पोटीं थरकांप व भय असा तो प्रजावत्सल व पराक्रमी होता.

या यज्ञप्रिय राजानें एक मोठा याग करावयास आरंभ केला. सर्व देशांत वार्ता गेली व मोठमोठे राजेरजवाडे यागदर्शनास आले. यज्ञसामुग्रीची सर्व तयारी केली होती,  तुपाचे हौद भरलेले होते. भांड्यांचे पर्वत रचले होते; समिधांचे समुद्र पसरलेले होते. हवन करण्यासाठीं अनेक ठिकाणाहून आहुत अनाहूत जमले होते. असा तो प्रचंड यज्ञ सुरु झाला. यज्ञकुंडांतील धृतपुष्ठ अग्निज्वाला गगनमंडळास भेदावयास गेल्या. यज्ञांतील धूर सर्वत्र पसरुन आज गगनच खालीं आलें कीं काय असा भास होत होता. यज्ञांतून उडणार्‍या ठिणग्या तारकांप्रमाणे चमकत होत्या.

राजबालक नचिकेता खेळत खेळत यज्ञभूमीसमीप आला. तेथील त्या प्रचंड ज्वाला, तो मंत्रघोष, तो जनसंमर्द सर्व पाहून तो तेथेंच तटस्थ उभा राहिला. त्याच्या तोंडावर मधुर स्मित खेळत होतें. डोळ्यांत कुतूहल व जिज्ञासा ही भरुन राहिली होतीं. उभा राहून कंटाळला व इकडे तिकडे त्या अफाट यज्ञभूमींत हो हिंडू लागला. राजबालकास रोध कोण करणार ?

हिंडता हिंडता नचिकेतानें एके ठिकाणी कित्येक गायी पाहिल्या. त्या गायी कशासाठी असा त्यानें तेथें असलेल्यास प्रश्न केला. त्या गायी दान देण्यासाठीं आणल्या आहेत, असें त्यास समजले. परंतु त्या गायी रोगट होत्या. केवळ अस्थिचर्म मात्र त्यांचे शिल्लक राहिलेले होते. त्यांचे शरीर म्हणजे हाडांचा सापळा. एकूण एक हाडें मोजून घ्यावीं.

त्या रुग्ण जीर्ण शीर्ण गायी पाहून नचिकेता क्षणीभर तटस्थ उभा राहिला. ‘माझे बाबा या असल्या गाई का दान करणार ! छे; हें अनुचित आहे. असें होतां कामा नयें !’ असा विचार त्याच्या मनांत सारखा येऊं लागला.

 

पुढे जाण्यासाठी .......