सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

बाल्य

बाळाला आतां पाय फुटले. तो रांगू लागला, लौकरच उभा राहूं लागला, चालूं लागला. तो कोळसे घेई नि रेघोट्या ओढी. आईला पुसतां भुई थोडी होई. परंतु एके दिवशीं मजाच झाली ! मजा कसली, तें मरण होतें. लहान रंगा खेळत होता. आणि तेथें एक सरसर प्राणी आला. रंगानें पटकन् टोंक धरुन तो पकडला.

''आई, ही बघ गंमत'' असें म्हणत आईला दाखवायला तो आला.
''टाक टाक, अरे तो विंचू'' आई घाबरुन ओरडली. बाळानें एकदम टाकला. नांगी वर करुन ती काळी सांवली मूर्ति निघाली. आईनें लांकडानें ती मूर्ति भंगली. 'आई आई' बाळ म्हणाला.

''किती छान दिसत होता ? त्याचा आंकडा कसा होता, नाहीं आई ? तूं त्याला मारलेंस. तूं वाईट आहेस. मला खेळायला झाला असता.''

आईनें बाळाला पोटाशीं घेतलें. जगदंबेची कृपा असें ती मनांत म्हणाली.

आणि नागपंचमीचा दिवस होता. नागोबा घेऊन नागारी हिंडत होते, पुंगी वाजवित होते. रंगाच्या अंगणांत नागोबा आला. पुंगी वाजत होती, नाग डोलत होता. रंगा एकदम पुढें गेला. त्यानें नागाच्या फणेला हात लावला. नागानें फुस् केलें. रंगा मागें झाला.

''काशीताई, रंगाला मागें घ्या'' मुलें ओरडली.

''भिऊं नका. नागोबा आज डसणार नाहीं. त्याला लाह्या द्या, दूध द्या; त्याला प पैसा द्या'' पुंगीवाला म्हणाला. पुंगी वाजूं लागली.
''छान छान आई नागोबा
डोल डोल करतो नागोबा''
असें म्हणत रंगा नाचूं लागला. पुंगीवाला गेला. मुलें गेलीं. काशीताई बाळाला घेऊन घरांत आल्या.

रंगा मोठा झाला. पांचा वर्षाचा झाला. त्याला रंगित पुस्तक देण्यांत आलें. पाटी आली. पेन्सील आली. रंगा शाळेंत जाऊं लागला. तो पाटीवर चित्रें काढी. मास्तर रागें भरत नि छडी मारीत. त्यानें एकदां छडी मारणार्‍या मास्तरांचे चित्र काढलें. मास्तरांच्या पायांजवळ एक मुलगा रडत होता. रंगा चित्रांत रंगूं लागला. एवढासा मुलगा. परंतु सुंदर चित्रें काढी. खडू, कोळसे त्याच्या पिशवींत नेहमीं असत. घराच्या भिंती रंगूं लागल्या. कधीं आई मग मारी, आनंदराव रागें भरत.

 

पुढे जाण्यासाठी .......