शनिवार, जानेवारी 18, 2020
   
Text Size

आधार मिळाला

''तुम्ही माझ्या होणं. उगीच का तिला मी माहेंरी पाठवलें ? मी मोठा योजक आहें. तुमचें दारिद्र्य जाईल. मुलाला कांही कमी पडणार नाहीं.''

चुलींतील लांकूड काशीनें त्याच्या अंगावर फेंकलें. जरा चुकलें नाहीं तर त्याचे डोळे जळते. ती नागिणीप्रमाणें तेथून निघून गेली. तो चंदुलाल बघतच राहिला. चूल धडधड पेटत होती. तो हंसला.

''मूर्ख बाई'' असें पुटपुटला.

तेथें टमाटोची कोशिंबीर होती. पठ्ठया ती खात बसला. त्याला काशीचें शील म्हणजे चटणी कोशिंबिरीहून अधिक मोलाचें नव्हतें वाटत.

काशी लाल होऊन घरीं आली. संतापाचें अश्रूंत परिवर्तन झालें. रंगा वासुकाकांकडे वाचीत होता.

''रंगा, तुझी आई लौकरशी आज घरीं आली ? बरें वाटत नाहीं की काय ?''
''आई आली ? मी बघून येतों.''

रंगा घरी आला. आई रडत होती. त्यानें आईच्या गळ्याला मिठी मारली. तिनें त्याला पोटाशीं घेतलें. कोणी बोलत नव्हतें.

''आई काय झालें ? आई ?''

''काय सांगूं बाळ ? आपण दुदैवी आहोंत. कशाला आलास अभागी आईच्या पोटीं?

''असें नको म्हणूं आई. तूं काकूंकडे येतेस ?''
''तूं जा. अभ्यास कर. तूं शहाणा हो. जा.''

रंगा रडत वासुकाकांकडे आला. त्यानें आई रडत आहे म्हणून सांगितलें. सुनंदा काशीकडे गेली. दोघी बोलत होत्या. काशीनें सारें सांगितलें.
''चोरीचा आळ घातला कीं काय ? उद्यां का पोलीस येतील ? सारे धिंडवडे,''
''तुम्ही आमच्याकडे चला. ते सारें करतील. घाबरुं नका.''

 

पुढे जाण्यासाठी .......