बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

निष्ठुर दैव

रंगा मुंबईस आला. त्याला तेथें शुन्य वाटत असे. शेजारच्या खोलींत दुसरें बिर्‍हाड आलें होतें. कोठें आहे ताई, कोठें आहे लिली ? ताईनें मला पत्र कां पाठवूं नये, पत्ता कां कळवूं नये ? परंतु पतीनें माझा अपमान केला तर ? तेथें त्यानें तमाशा मांडला तर ? माझी ताई संयमी, सहनशील, विवेकी आहे. नाहींतर पत्र पाठवल्यावांचून ती राहती ना. त्याच्या ट्रंकेत ताईला भाऊबीजेच्या दिवशी देण्यासाठी म्हणून काढलेलें तिचें चित्र होतें. परंतु दिवाळी भाऊबीज फैजपूरच्या नगररचनेंतच गेली. आतां मनांत भाऊबीज, मनांतच ताईला भेटायचें, ओवाळायचें.

एके दिवशी रंगा बापुसाहेबांकडे गेला.

''बरेच दिवसांनी आलास रे. काँग्रेसच्या प्रदर्शनांतील कामामुळे थकलास. खरें ना ? घरीं राहून आलास.''

''हो, घरीं होतों चार दिवस. मी आतां विश्वभारतींत जाणार आहें. येथलें सारें सामान नेण्यासाठीं व तुम्हां सर्वांचा प्रेमळ निरोप घेण्यासाठीं म्हणून आलों. तुमचें, आईचें माझ्यावर किती प्रेम. तुम्ही धीर दिलात, सारें दिलेंत.
''तुम्हि देव दिला दिवा दिला
तुम्हि मातें हितपंथ दाविला
करुणा विसरेन का असा
उतराई प्रभु होउं मी कसा''

असे चरण म्हणून रंगा सद्गदित झाला. गंभीर वृत्तीचे बापुसाहेब परंतु तेहि गहिवरले.

''रंगा, कोठले रे हे चरण, कोणाची कविता ?''
''वासुकाकांच्या तोंडूनच मी ऐकलें होते. ते हे चरण पुष्कळदां गुणगुणतात.''
''सुरेख आहेत.''
''मलाहि आवडतात. खरेंच बापू, तुम्ही मला हें सारें दिलें. जो दिवा विझणार नाही असा ध्येयवादाचा दिवा मला तुम्ही दिला आहे. ज्याला जीवनाचे ध्येय मिळालें त्याला देव मिळालाच.''

''रंगा, देव या शब्दाचा अर्थ प्रकाशणें असाच आहे. प्रकाशमय व्यक्ति म्हणजे देव. ज्यांना जीवनाच्या पथावर प्रकाश दिसत आहे, त्यांच्या दृष्टीसमोर संशयाचें धुकें नाहीं, अंधार नाहीं, ते देवच. त्यांना देव मिळाला; देवमय ते झाले.''

 

पुढे जाण्यासाठी .......