बुधवार, आँगस्ट 12, 2020
   
Text Size

मुंबईस

दोन ताटें तयार झालीं. पाट नव्हतेच. रंगानें वर्तमानपत्राची घडी बसायला घेतली. लहान आसन नयनाला. रंगाला ताईची आठवण झाली. तो एकदम शून्य मनानें तेथें उभा राहिला.

''रंगा, ये. काय झालें ?''
''आठवण आली.''
''कोणाची ?''
''लिलीची, तिच्या ताईची. या शेजारच्या खोलींत ताई रहात असे. मला कधीं लागलें कांही म्हणजे ताईकडून मी आणायचा. परंतु आज कोठें असेल ताई. तिची ती गोड मुलगी ?''

''तें भिंतीवर चित्र आहे तीच का ताई ?''
''हो. मी तें तिला भाऊबीजेला देणार होतों. परंतु तिच्या नवर्‍यानें एकदम येथली जागा बदलली. कोठें गेली रहायला मला कळलें नाहीं. मीहि पुढें मुंबई सोडली. आतां पुन्हां परत आलों.''

''तूं विश्वभारतींत होतास ना ?''
''तुला काय माहीत ?''
''मी हल्लीं येथल्या आर्टस्कूलमध्यें शिकत आहे. मी मॅट्रिकला नापास झालें. एक वर्ष आजारी होतें. आतां सारें ठीक आहे. आवडीचा अभ्यास करित आहें. तुझ्या हातचीं चित्रें आर्टस्कूलमध्यें आहेत. तेथले एक शिक्षक तुझ्या आठवणी सांगतात. मी ऐकतें. तूं एकदां चित्र काढित होतास. वेळ संपली. तूं रागावलास. मला हें चित्र पुरें करुं दे. या वेळची माझी मनोरचना पुढच्या वेळेस कशी असेल ? मनांत रंग जमले आहेत. तेथें मिश्रणें तयार आहेत. मला बसूं दे येथें. परंतु घंटा झाली. तुला सारें गुंडाळावें लागलें. होय ना ?''

''हो, आठवतो तो प्रसंग. काय ग नयना, माझा पत्ता तुला कोणी सांगितला ?''
''कोणी तरी म्हणालें की रंगा मुंबईस परत आला आहे. जुन्या खोलींतच राहतो.''
''जुनी खोली तुला काय माहीत ?''

''तूं पंढरीला तो पत्ता कळवलेला होतास. तो नव्हात का पेशावरला जातांना येथें आला ? तूं पुरणपोळी केलीस. पंढरी पुण्याला मला भेटत असे. तुझा तो मित्र म्हणून त्याच्याविषयींहि मला आपलेपणा वाटे. त्यावेळेस त्याच्याजवळून पत्ता मी घेतला होता.''

 

पुढे जाण्यासाठी .......