शुक्रवार, जुलै 10, 2020
   
Text Size

मुंबईस

''तेथें कोण तुला तुरुंगांत घालीत आहे ?''
''आपण कायमचेंच तुरुंगांत आहोंत. इंग्रजानें गुलाम करुन ठेवलेलें आहे. सारें राष्ट्र त्यानें मारलें. आणि माझ्या राष्ट्राचा अन्तर्बाह्य विकास अडवणार्‍या सत्तेचे दिवाणखाने मी रंगवित बसूं ? नयना, स्वतंत्र हिंदुस्थानांतील पार्लमेंट मी रंगवीन. तेथें राष्ट्राचा इतिहास रंगवीन. लोकमान्य न्यायाधीशासमोर गंभीरपणें म्हणत आहेत 'येथल्या न्यायासनापेक्षां श्रेष्ठ असे ईश्वरी न्यायासन आहे. त्याच्यासमोर मी निर्दोषीच आहें. माझ्या हालअपेष्टांनींच माझें कार्य पुढें जाईल.' तो प्रसंग मी चितारीन. आज मला येईल का रंगवतां ? मिठाचा खडा उचलतांना हें रावणी राज्य मी समुद्रांत बुडवतों असें महात्माजी निर्धारानें उद्गारले. तें येईल चितारतांना ? नयना, माझी कला मी विकणार नाहीं. माझ्या राष्ट्राचा सत्यानाश करणार्‍यांकडून माझ्या कुंचल्यांची प्रशंसा मला नको आहे. कोटयवधि जनतेच्या संसारांतील सारा रंग ज्यांनीं नाहींसा केला, त्यांच्याकडून माझ्या कागदी रंगाची प्रशंसा मला नको. आमचे राजेरजवाडे, ब्रिटिशांचे पाय चाटणारे कुलुंगी कुत्रे ! त्यांची कृपा मला नको. ज्यांना प्रजेविषयी आस्था नाहीं, घोडे, शर्यती, जुगार, विलायती यात्रा, सतरा लग्नें, कोल्हीं कुत्रीं, खानपान-हे राजेरजवाडे म्हणजे का मानवजातीच नमुने ? भ्रष्ट, पतित अशी ही विलासलोलुपांची जात आहे. त्यांचा स्पर्शहि नको. मी उपाशी राहीन, परंतु यांच्या दारीं जाणें नको.''

''रंगा, नयना साधी मुलगी आहे. मला कोठें आहे तुझी देशभक्ति ?''
''नसेल तर घे. देशभक्ति नसणें म्हणजे कांही भूषण नव्हे. सर्वांना सभोंवतालच्या चराचर सृष्टीचें भान हवें. कलावंताला तर आधी हवें. मला दु:खी दरिद्री राहूं दे. म्हणजे मी दरिद्र नारायणाचा चित्रकार होईन. त्यांचा कलात्मक प्रतिनिधी होईन. नयना, तूं वाईट नको वाटून घेऊंस. हें काय तुझ्या मनांत आलें ?''

''नयना वेडी आहे.''
''खरेंच वेडी. आतां शहाणी हो. नवीन भावना शीक.''
''तूं शिकलास भावना ? या नयनाच्या भावना तुला कळतात ? उथळ आहेस तूं. जगाच्या भावना ओळखायला निघालेल्या, तुझ्यासमोर एक मुलगी आहे तिच्या भावना ओळखल्यास ? कां ती आली, कां जेवली, कां चुलीजवळ बसली, कां हक्कानें डबे शोधलेंन, कां दिल्लीस चल म्हणते ? ती तुला दिल्लीचा सम्राट् हो म्हणाली. परंतु तिनें तुला आधीं स्वत:चा हृदयसम्राट् केलें आहे. आंधळा आहेस तूं. भावना शिकवायला निघाला.''

रंगा मुका होता.
''रंगा, तुझ्यावर मी प्रेम करतें. गेली कांही वर्षे मी दूर होतें. तूं दूर होतास. परंतु तूंच माझें जीवन व्यापलें आहेस. तूं कधीं केव्हां माझ्या जीवनांत शिरलास तें कसें सांगूं ? चोराच्या पावलांनीं कसा आलास तें आठवत नाहीं. परंतु अंगणांतून आंत आलास नि अखेर हृदयगाभार्‍यांत जाऊन बसलास. तुला आहे कांही कल्पना ? आहे कांही भावना ? तुझें पदक माझ्याजवळ आहे. आईनें शेवटीं हृदयाशीं धरलेला तुझा फोटो माझ्याजवळ आहे. त्या दोन वस्तु म्हणजे माझी इष्टेट. माझे बाबा कुबेर आहेत. परंतु त्या संपत्तींत मला रस नाहीं.''

 

पुढे जाण्यासाठी .......