शनिवार, जुलै 11, 2020
   
Text Size

मुंबईस

''नको नयना. दिल्लीचा मोह नको. दिल्लीला सर्वांचा नाश होतो. तेथलें वैभव क्षणभर शोभतें नि धुळीस मिळतें. दिल्ली दुर्दैवी जागा आहे. भाऊबंदकीची, स्पर्धेची, सत्तेची, मारामारीची जागा. दिल्लीच्या जवळच कौरवपांडव लढले नि गेले. पठाण आले, मोगल आहे, मराठे आले सारे आले; नि गडप झाले. इंग्रजहि जाईल.''

''रंगा, अरे जगांत सारेच जायचे असतात. कोणी खेड्यांत राहिला म्हणजे मरत नाहीं असे नाहीं ? आणि रोमचें वैभव का राहिलें ? बाबिलोन, निनवी, बगदाद, गझनी, कोठें आहे त्यांचे वैभव ? विजयनगर, व्दारका, राजगृह, कोठें आहे तेथलें वैभव ? तूं दिल्लीला कशाला नांवे ठेवतोस ? उद्यां स्वतंत्र हिंदुस्थानची राजधानी दिल्लीच होणार. का नागपूर करणार ? दिल्लीच्या भोंवती विध्वंस नि विनाश असले तरी तेथें एक तेजोवलयहि आहे. तूं असा अंध श्रध्दाळू असशील अशी नव्हती कल्पना. जाऊं दे या गोष्टी. रंगा, तूं मला रुकार दे. दिल्लीचे बंगले रंगव. एखादें चित्र भिंतीवर रंगव. मग त्याची स्तुति सातासमुद्रांपलीकडच्या पत्रांतून येईल. या खोलींत बसून भारताचें नांव दिगंतांत कसें नेणार तूं ? संधि शोधली पाहिजे, मिळत असेल तर पकडली पाहिजे आणि साध्याच्याजवळ गेलें पाहिजे. रंगा, सांगना.

''लहानशा खोलींत बसूनच मी भारताचें नांव दिगंतांत नेईन. लहानशा खोलींतील मलमलीच्या विणकरांनीं जगभर भारताचें नांव नेलें. प्रभूची इच्छा असेल तर रंगाला तें शक्य होईल. परंतु इंग्रजी अधिकार्‍यांचे बंगले रंगवायला मी येणार नाहीं.''

''रंगा, कलावान् का व्देषाचा पुजारी असतो ? तूं इंग्लंडात गेलास तर तेथली कला नाहीं पाहाणार ? इंग्रजी पुस्तकें वाचतां. त्यावेळेस नाहीं म्हणत कीं आम्हांला गुलाम करणार्‍यांचें कांही नको असें. तुला तुझी कला संकुचित न बनवो.''

''नयना, कलेनें विशाल क्षितिजें दाखवावीं हें खरें. कलावानच जगाचा ऐक्यकर्ता. खरी कला सर्वांना जोडील. मी इंग्रजव्यक्तींचा व्देष नाहीं करीत. परंतु गुलामगिरीचें प्रतीक ठरलेल्या बंगल्यांत मी ध्येयवादी चित्र कसें रंगवूं ? आणि तेथें सहन तरी कोण करील ? मी तेथें माझ्या इच्छेप्रमाणें थोडेंच रंगवूं शकणार आहें ? त्यांच्या इच्छेचा गुलाम.''

 

पुढे जाण्यासाठी .......